728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

विषारी दारुकांड - मोहन दुग्गलसह चौघांना २२ पर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल येथील विषारी दारुमुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या आता आठ झाली आहे. तर जिल्ह्यात दारूसेवनामुळे दगावलेल्यांची संख्या दहाहून अधिक झाली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसंानी मोहन दुग्गल याच्यासह चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे हे करीत आहेत.

पांगरमल येथे राजकीय उमेदवाराने दिलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारुचे अतिसेवन केल्यामुळे चौघे जण दगावले. पोपट रंगनाथ आव्हाड, राजेंद्र खंडू आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड, प्रभाकर पेटारे हे दगावले. बुधवारी हिरोजी नाना वाकडे व राजेंद्र भानुदास आव्हाड हे दोघे दगावले. तर गुरूवारी शहादेव भाऊराव आव्हाड यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा उद्धव मुरलीधर आव्हाड (रा. आव्हारवाडी, ता. नगर) यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे पांगरमलच्या पार्टीतील अतिमद्यसेवन करणाऱ्या बळींची संख्या आठ झाली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. सुरूवातीला पोलिसांनी शिवसेनचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार जितू गंभीर व जाकीर शेख यांना अटक करण्यात आली. हे दोघे सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये विषारी दारुचा कारखाना चालवत असल्याची माहिती समोर आली होती. हे कॅन्टीन मोहन श्रीराम दुग्गल याच्या नावावर असल्याने पोलिसांनी त्यालाही आरोपी केले होते. तेव्हापासून दुग्गल फरारच होता.

शुक्रवारी रात्री उशिरात त्याला नांदेड पोलिसांना पकडून नगरच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. नांदेड पोलिसांनी गुरुव्दाराजवळील एका लॉजमध्ये धाड टाकून संदीप मोहन दुगल (२८), मोहन श्रीराम दुगल (६०) आणि वैभव जयसिंग जाधव (३०) या तीन जणांना पकडले. हे सर्व जण नगरमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एका चारचाकी गाडीने नांदेडला पळून गेले होते. ती चारचाकी गाडी सुध्दा नांदेड पोलिसांनी जप्त केली. त्यांना पकडून नगर पोलिसांना कळवण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नांदेडला जाऊन सर्वांना ताब्यात घेतले.

नांदेडचे पोलिस अधीक्षक संजय येनपुरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, सहायक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद दिघोपरे, पोलिस हवालदार जसवंतसिंघ शाहू, दशरथ जांभळीकर, रामदास श्रीमंगले, पांडूरंग जिनेवाड, सदाशिव आव्हाड, तानाजी मुळके यांच्या पथकाने ही कामगिरी केली. याशिवाय सिव्हिल हडको परिसरात राहणाऱ्या भरत रमेश जोशी यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: विषारी दारुकांड - मोहन दुग्गलसह चौघांना २२ पर्यंत पोलिस कोठडी Rating: 5 Reviewed By: DNA Live24