History of Maharashtra

बनावट दारू निर्मितीचे आंतरराज्य रॅकेट निष्पन्न

अहमदनगर । DNA Live24 - नगर तालुक्यातील पांगरमल (ता. नगर) येथे अति मद्यसेवन केल्यामुळे नागरिकांचे बळी गेल्यानंतर बनावट दारुनिर्मितीचे रॅकेट उजेडात आले. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटची व्याप्ती राज्यभर पसरली असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिस उपअधीक्षक तथा तपासी अधिकारी आनंद भोईटे यांनी ही बाब बुधवारी दुपारी न्यायालयात सांगितली.

बनावट दारु निर्मितीच्या रॅकेटमध्ये धुळ्यातील एका कुख्यात मद्यतस्कराचा समावेश असून त्यालाही पोलिस ताब्यात घेणार आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या १५ वर गेली आहे. १४ फेब्रुवारीला बबन आव्हाड (रा. पांगरमल) यांच्या  फिर्यादीवरुन पोलिसांनी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, भाग्यश्री मोकाटे, मंगल महादेव आव्हाड, महादेव आव्हाड, शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड व रावसाहेब आव्हाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध व इतर कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला.

सुरुवातीला भीमराज आव्हाडला अटक झाली. त्याच्या माहितीवरुन पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये सुरू असलेल्या बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. बनावट दारुनिर्मिती केल्याप्रकरणी जगजीतसिंग गंभीर, जाकीर शेख व हमीद शेख यांना अटक करण्यात आली. संबंधित कॅन्टीन मोहन दुगलच्या नावे असल्याचे समजल्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह आणखी चौघांना अटक केली. नांदेडमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मोहन श्रीराम दुगल (६०), संदीप मोहन दुगल (२८) आणि वैभव जयसिंग जाधव (३०) यांना अटक झाली. सिव्हिल हडकोत राहणाऱ्या भरत रमेश जोशी यालाही अटक केली. तसेच रावसाहेब आव्हाडलाही अटक झाली.

भीमराज आव्हाड, रावसाहेब आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. जितू गंभीर, जाकीर शेख, हमीद शेख यांनाही बुधवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. तर मोहन दुगल, संदीप दुगल, वैभव जाधव, भरत जोशी यांच्या पोलिस कोठडीत मात्र २५ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात अाली आहे. तर गोविंद मोकाटे, भाग्यश्री मोकाटे, मंगल आव्हाड, महादेव आव्हाड, दादा वाणी, याकूब शेख (नालेगाव) व नन्हे शेवानी हे अद्यापही फरारच आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

गंभीर, शेख व इतर आरोपी धुळ्यातील शिरपूरचा कुख्यात गुन्हेगार दादा वाणी याचे नाव समोर आले आहे. त्याच्याकडून अल्कोहोल घेत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही आरोपी केले आहे. वाणी सध्या धुळे पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे. आता त्याला नगरच्या गुन्ह्यात वर्ग करुन घेतले जाईल. याशिवाय याकूब शेख (नालेगाव), नन्हे शेवानी यांची नावेही समोर आली आहेत. हेही आरोपींना मुद्देमाल पुरवत होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget