728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नेवासे नगरपंचायतीचा रणसंग्राम लवकरच रंगणार

नेवासे । DNA Live24 -  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम संपत नाही, तोच आता निवडणूक आयोगाने नेवासा नगरपंचायतच्या रणसंग्रामाचेही नियोजन केले आहे. निवडणुकीसाठी मतदारयादी प्रसिद्धी व हरकतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आता नेवासा नगरपंचायत निवडणुकीमुळे नेवाशातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

राज्यातील ४ नगरपंचायती व एका नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला असून त्यात नेवासा नगरपंचायतचाही समावेश आहे. आयोगाने नेवासा तसेच सालेकसा (जि. गोंदिया), शिराळा (जि. सांगली) व रेणापूर (जि. लातूर) या नगरपंचायती व नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम दिला होता. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी प्रभाग रचनेच्या अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. ५ जानेवारी २०१७ ही तारीख अधिसूचित करण्यात आली आहे.

५ जानेवारी २०१७ ला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारयादीनुसार नगरपंचायतची मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर २७ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येतील. लेखनिकांच्या झालेल्या चुका, दुसर्‍या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाल्यास, विधानसभा मतदारयादीत नाव आहे, मात्र प्रभागाच्या मतदारयादीत वगळले गेले असल्यास नाव समाविष्ट केले जाणार आहे.   दुबार नावे प्रसिद्ध झाली असल्यास तसेच मृत अथवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली जाईल. 

४ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून प्रभागनिहाय मतदारयादी अंतिम केली जाणार आहे. प्रभागनिहाय मतदारयाद्या अधिप्रमाणित करून ७ मार्च २०१७ रोजी प्रसिद्धीची सूचना देण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव घ. ना. कानेड यांनी आदेशात म्हटले आहे. या प्रक्रियेमुळे नेवासे नगरपंचायतीसाठी इच्छुक असलेल्यांनी तयारी सुरू केली आहे. वाढत्या तापमानामध्ये आता नेवाशाच्या राजकीय रणधुमाळीचीही भर पडणार आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नेवासे नगरपंचायतीचा रणसंग्राम लवकरच रंगणार Rating: 5 Reviewed By: DNA Live24