History of Maharashtra

जि. प.च्या उपाध्यक्ष पदावर गडाखांची वर्णी?

अहमदनगर । DNA Live24 - जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून, या राजकीय घोळात भाजपने उडी मारली आहे. राष्ट्रवादीसह, गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला सोबत घेत, काँग्रेसला धोबीपछाड देण्याचा चंग भाजपने बांधला आहे. राष्ट्रवादी व भाजप एकत्र आले तरीही 'मॅजिक फिगर' गाठता येणे शक्य नसल्याने गडाखांचे पाच सदस्य आता महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे 'क्रांतिकारी शेतकरी पक्षा'कडून झेडपीच्या उपाध्यक्ष पदासाठी 'सुनील गडाख' यांचे नाव ऐनवेळी पुढे येण्याची दाट शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या सत्तेचा आघाडीचा डाव अध्यक्षपदावरून फिस्कटला तर संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. यासाठी आघाडीतील नाराज सदस्यांना गळाला लावण्यासाठी राजकीय गळ टाकण्याचीही तयारी केली जात आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळाची जुळवणी करण्यासाठी प्राथमिक चर्चा सुरू आहे. एकीकडे गडाख- घुले वाद वाढलेला असताना दस्तुरखुद्द शरद पवारांनी मध्यस्थी करण्याची तयारी चालविली असल्याचीही चर्चा आहे.

तालुक्यातील सात पैकी पाच जागा जिंकून गडाखांनी आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विरोधकांना पळता भुई थोडी करत त्यांनी 'सरकार' कोणाचेही असो, 'नेवाशात सत्ता मात्र गडाखांचीच' हे दाखवून दिले आहे. अडीच वर्षांवर आलेल्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांकडे पहिले जाते. त्यामुळे विधानसभेसाठी गडाखांनी आपली दावेदारी मजबूत केली आहे. त्यामुळे सध्या कुठल्याही पक्षात प्रवेश न करता तटस्थ राहून जिल्हा परिषदेचा 'रिमोट' आपल्याकडे ठेवण्याची त्यांची इच्छा आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून माजी खा. यशवंतराव गडाख, माजी आ. शंकरराव गडाख यांना पुन्हा पक्षप्रवेश करण्याची विनंती होत आहे. मात्र सध्या तरी गडाखांनी 'वेट अँड वॉच'चीच भूमिका स्वीकारल्याचे दिसते. राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवून पुन्हा राष्ट्रवादी सोबत गेल्यास गडाखांना मोठा राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत न जाता भाजप - राष्ट्रवादीच्या आघाडीला पाठिंबा देत उपाध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची नामी संधी गडाखांकडून सोडली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे सत्तेच्या घोडेबाजारात सध्या तरी गडाखांचीच चलती असल्याचे दिसते आहे.

अशी आहे शक्यता-
राष्ट्रवादी १८ + भाजपा १३ + जनविकास आघाडी १ + क्रांतिकारी शेतकरी पक्ष ५ = एकूण ३७
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget