History of Maharashtra

कोपर्डी खटला - वकिलांच्या गैरहजेरीमुळे आरोपीला १९ हजारांचा दंड

अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) खटल्याच्या सुनावणीकरिता आरोपी संतोष भवाळ याचे वकील अॅड. बाळासाहेब खाेपडे हे सलग तिसऱ्यांदा गैरहजर राहिले. त्यामुळे विशेष सरकारी वकिल अॅड. उज्वल निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साक्षीदार डॉक्टर तीनदा मुंबईहून येऊनही खटल्याचे कामकाज चालू शकत नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने साक्षीदारांना येण्या-जाण्याचा खर्च म्हणून आरोपीकडून एकूण १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले. अॅड. खाेपडे यांच्या अनुपस्थितीत शुक्रवारी खटल्याचे कामकाज चालले.

कोपर्डी खटल्याची नियमित सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पहात आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता खटल्याची सुनावणी सुरू झाली, सलग तिसऱ्या वेळीही आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. खोपडे यांच्या वतीने न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी अर्ज देण्यात आला. पुन्हा रक्तदाब वाढल्याचे कारण त्यांनी अर्जात दिलेले होते. खटल्यासाठी पुढील तारिख देण्याची विनंती त्यांनी केली होती.

त्यावर अॅड. उज्वल निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपीच्या वकिलांनी यापूर्वीही याच कारणावरुन साक्ष लांबवली. खटल्यातील एक साक्षीदार थेट मुंबईहून तीन वेळा आले. इतर साक्षीदार पुण्याहून व कर्जतहून आले आहेत. न्यायालयाने यापूर्वी सूचना देवूनही आरोपीचे वकील गैरहजर रहात असल्यामुळे साक्षीदारांना तीनदा हेलपाटे झाले. त्यामुळे आरोपीला दंड करण्याची विनंती त्यांनी केली. ती मान्य करीत न्यायालयाने आरोपीला एकूण १९ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले. 

खटल्याच्या कामकाजासाठी आलेल्या दोन साक्षीदारांचे प्रत्येकी ५ व तीन साक्षीदारांचे प्रत्येकी ३ हजार, असा एकूण १९ हजार रुपयांचा दंड आरोपीने भरावा, हा दंड भरल्याशिवाय त्याच्या वकिलांना या साक्षीदारांची उलटतपासणी घेता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. अॅड. निकम यांनी नवा साक्षीदार तपासण्यासाठी मागितलेल्या परवानगी अर्जावर आरोपींच्या वकिलांचे म्हणणे बाकी असल्यामुळे त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही

खटला अंतिम टप्प्यात - कोपर्डी खटल्यात आतापर्यंत जवळपास १५ साक्षीदार तपासले आहेत. आता तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवल्या जातील. या खटल्याच्या दोषाराेपपत्रात जोडलेल्या साक्षीदारांच्या यादीत पन्नासहून अधिक साक्षीदारांची नावे होती. त्यापैकी महत्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सुमारे २० ते २५ साक्षीदारांच्या साक्षी वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे या खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट आहे.
प्रोजेक्टरवर पुरावे - कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या शरीरावरील जखमांचे छायाचित्र असलेले पुरावे शुक्रवारी न्यायालयात दर्शविण्यात आले. विशेष सरकारी वकिलांच्या विनंतीनुसार प्रोजेक्टरवर मोठ्या आकारात हे पुरावे दर्शविण्यात आले. पीडितेच्या शरीरावर असलेल्या जखमा मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पु शिंदे याच्याच असल्याचे दंतवैद्यक शास्त्राची पदवी घेतलेल्या महिला डॉक्टरांनी आपल्या साक्षीत सांगितले. मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांच्या दातांचे नमुने त्यासाठी घेतले होते.
तीन साक्षीदार तपासले - पीडितेच्या शरीरावरील जखमांबद्दल साक्ष देताना डॉक्टरांनी सांगितले की कोणत्याही दोन व्यक्तींच्या दातांची रचना एकसारखी असू शकत नाही. जखमांवरुन त्या कोणत्या आरोपीच्या दातांनी झालेल्या आहेत, हे ओळखण्याची पद्धत त्यांनी सांगितली. एका पोलिसाची व पंचाची साक्षही शुक्रवारी पूर्ण झाली. पोलिसाने आपण ३७ सीलबंद पाकिटे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नेल्याचे साक्षीत सांगितले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget