History of Maharashtra

कोपर्डी खटला - पुण्यातील व्यक्तीची साक्ष होणार की नाही?

अहमदनगर । DNA Live24 - दोषारोपपत्रातील साक्षीदारांच्या यादीत नाव नसलेल्या एका व्यक्तीची साक्ष नोंदवण्याची परवानगी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात मागितली आहे. त्याबाबत शनिवारी सरकार पक्षाने आपली बाजू स्पष्ट केली. संदर्भादाखल सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडेही दिले. आरोपींच्या वकिलांनी मात्र आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यामुळे पुण्यातील "त्या' व्यक्तीची साक्ष नोंदवायची किंवा नाही, यावर आता सोमवारी निर्णय अपेक्षित आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे. कोपर्डीची घटना झाली, त्यावेळी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या तत्कालीन ठाणे अंमलदाराची साक्ष शनिवारी नोंदवण्यात आली. यावेळी आरोपी भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे उपस्थित होते. तत्कालीन ठाणे अंमलदार संजय लोखंडे यांनी सरतपासणीत त्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. मुलीच्या आजोबांनी पोलिस ठाण्यात फोनवरुन कोपर्डी घटनेची पहिली माहिती दिली, असे त्यांनी सांगितले. 

खटल्यात पुण्यातील एका व्यक्तीची साक्ष नोंदवण्याची परवानगी अॅड. निकम यांनी मागितली आहे. त्याबाबत ते म्हणाले, या खटल्यातील एक साक्षीदार १३ जुलै २०१६ ला पुण्यात होता. त्याला तेथे एका व्यक्तीकडून कोपर्डीतील घटनेची माहिती समजली होती. त्यावेळी साक्षीदाराला तो गावात असताना आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे आपल्या घराजवळ चकरा मारत असल्याचा प्रकार आठवला. ही गोष्ट या साक्षीदाराच्या उलटतपासणीत समोर आली होती, असेही निकम म्हणाले.

त्यामुळे या साक्षीबद्दल शहानिशा करण्यासाठी पुण्यातील व्यक्तीची साक्ष घेणे गरजेचे आहे, असे अॅड. निकम म्हणाले. आरोपींच्या वकिलांनी मात्र विरोध केला. सरकारी वकील नव्याने गुन्ह्याची बांधणी करीत आहेत, असा आक्षेप त्यांनी घेतला. त्यावर अॅड. निकम म्हणाले, खटल्याच्या दृष्टीने पुण्यातील त्या व्यक्तीची साक्ष नोंदवणे महत्वाचे आहे. त्याचा आरोपींना तोटा होणार नाही. अशी साक्ष नोंदवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही न्यायनिवाडेही त्यांनी न्यायालयात सादर केले.

आरोपीच्या वकिलांनी मात्र अॅड. निकम यांनी ऐनवेळी सादर केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या प्रतींचा अभ्यास करायचा असल्याचे सांगून त्यासाठी वेळ मागितला. तसेच याबाबत सोमवारी आपले म्हणणे सादर करु, असे सांगितले. त्यामुळे पुण्यातील व्यक्तीची साक्ष नोंदवण्याबद्दल शनिवारी निर्णय होऊ शकला नाही. याबाबत सोमवारी आरोपींचे वकील म्हणणे मांडतील. त्यानंतर या व्यक्तीची साक्ष नोंदवायची किंवा नाही, याबाबत न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.

नियंत्रण कक्ष अनभिज्ञ - मुलीच्या आजोबांनी आपल्या नातीला कोणीतरी मारून टाकले असे फोनवरुन सांगितले. तशी नोंद स्टेशन डायरीला घेऊन पोलिस निरीक्षक गवारे यांना माहिती दिली. त्यानंतर गवारे व इतर सहकारी घटनास्थळी गेले. रात्री उशिरा फिर्याद नोंदवण्यात आली, असेही त्यांनी साक्षीमध्ये सांगितले. आरोपींच्या वकिलांनी या ठाणे अंमलदाराची उलटतपासणी घेतली. उलटतपासणीत लोखंडे यांनी घटनेची माहिती त्यावेळी नियंत्रण कक्षाला दिलीच नव्हती, अशी बाब समोर आली.
दंड माफीची विनंती - या खटल्याच्या सुनावणीला आरोपी संतोष भवाळ याचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे हे सलग तीन वेळा गैरहजर होते. शनिवारी ते उपस्थित होते. गेल्या वेळी न्यायालयाने साक्षीदारांना खर्च म्हणून आरोपीला एकूण १९ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले होते. त्यावर अॅड. खोपडे यांनी एक अर्ज न्यायालयात दिला. संबंधित साक्षीदारांची उलटतपासणी घ्यायची नाही. त्यामुळे आरोपीला आकारलेला दंड माफ करावा, अशी विनंती त्यांनी अर्जामध्ये केली आहे. त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget