History of Maharashtra

'मनोधैर्य' मिळूनही चिमुकल्या कळीच्या नशिबी हेळसांडच

अहमदनगर । DNA Live24 - अडीच महिन्यांपूर्वी केडगाव परिसरात चिमुकलीवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण देश हळहळला. अत्याचारानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. पण, सुरूवातीला पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ती वाचली. काही दिवसांनी आरोपीही पकडला गेला. याबाबत स्नेहालयच्या पाठपुराव्यानंतर तिला मनोधैर्य योजनेतून मदतही जाहीर झाली. मात्र, पोलिस व शासकीय बालसेवी यंत्रणांच्या कार्यपद्धतीमुळे ही अत्याचारग्रस्त कळी (नाव बदललेले) २ फेब्रुवारीपासून तिच्या पालकांसह बेपत्ता आहे.

बाळू गंगाधर बर्डे (वय ३० , रा. सोनगाव, राहुरी) या आरोपीने कळीच्या आई-वडिलांशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. ८ डिसेंबर २०१६ ला सायंकाळी त्याने ३ वर्षांच्या चिमुकलीवर रेल्वे स्टेशन परिसरात निर्जन ठिकाणी अत्याचार केले. तिला तेथेच सोडून तो पळून गेला. बेवारस कळीची माहिती चाईल्डलाईन व कोतवाली पोलिसांना समजताच त्यांनी कळीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. चिमुकली अत्यवस्थ असल्याने तिला पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

चाईल्डलाईन टीमने तेथेही चिमुकलीची साथ-सोबत केली. तेथे तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तेव्हापासून तिची दररोज वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे झालेले आहे. या सर्व घटनाक्रमात तिचे आई-वडील बेपत्ताच होते. दरम्यान नगर पोलिसांनी आणि चाईल्डलाईनच्या कार्यकर्त्यांनी पालकांची व आरोपीची शोध मोहिम सुरु ठेवली. तीन दिवसांनी निरागस कळीला ससून हॉस्पिटलमधून पुन्हा नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान तिच्या आई-वडिलांचा शोध लावण्यात आला. आरोपीचाही माग शोधून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. चाईल्डलाईन कार्यकर्त्यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा व पोलिसांना केलेली मदत यात महत्वाची ठरली. चिमुकलीच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्यावर स्नेहालय व चाईल्डलाईनने मुलीला निवारा देण्याची तयारी दर्शविली. पण तिच्या आई वडिलांनी याला नकार देत मुलीला स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा आग्रह धरला.

बाल कल्याण समितीने या चिमुकलीला संस्थात्मक आश्रय द्यावा, असा एक तोंडी आदेश दिला. तथापि नगरच्या शासकीय बालगृहाने कळीला आश्रय देण्यास असमर्थता दर्शविली. कळी अनाथ नसून तिला आई वडील असल्याने शासन आदेशानुसार तिला संस्थेत आश्रय देता येत नसल्याचे कारण त्यांनी दिले. वास्तविक, कळीला जंतू संसर्ग होण्याची भीती असल्याने रुग्णालयाची सुविधा असलेल्या स्नेहालय सारख्या संस्थेत ठेवण्याची आवश्यकता होती.

चाईल्ड लाईन व स्नेहालय यांनी कळीला मदत, औषधोपचार व संरक्षण देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला. मात्र, एक महिन्यापूर्वी कळीसोबत तिचे आई-वडील अचानक बेपत्ता झाले. नंतर चाईल्डलाईनने कोतवाली पोलिस ठाण्यात कळी बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण, मुलगी तिच्या पालकांसोबत असल्याने तिचा अथवा तिच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत महिला बाल विकासकडेही दाद मिळाली नाही.

शासनातील कोणतीही यंत्रणा या संदर्भात जबाबदारीने आणि संवेदनशीलपणे आपले कर्तव्यपालन करीत नाही. या विदारक वस्तुस्थितीकडे स्नेहालय परिवारातर्फे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती मनेका गांधी यांच्यासह शासनातील सर्व यंत्रणांचे लक्ष ई मेल द्वारे वेधले. त्यांनी मदतही जाहीर केली. मात्र, कळी व तिचे पालक सध्या बेपत्ता झाल्यामुळे या मदतीचा तिला लाभ मिळणे कठीण झाले आहे.
तांत्रिक कारणामुळे हेळसांड - स्नेहालयने कळीची सेवाशुश्रुषा व तिचे दीर्घकालीन पुनर्वसन करण्याची तयारी दर्शविली. पण कळीच्या आई-वडिलांनी त्यालाही नकार दिला. मुळात आई-वडिलांच्या बेजबाबदारपणामुळे अत्याचार होतो, तेव्हा अशा बालकास ताब्यात घेऊन सुयोग्य संस्थेत पुनर्वसन करण्याचा अधिकार बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीस आहे. याकडे बालसेवी संस्थांनी लक्ष वेधले. पण, आई-वडील मुलीचा ताबा देत नाहीत, हे कारण सांगून कळीला बालसेवी संस्थेकडे देण्यास नकार देण्यात आला.
केंद्रीय मंत्र्यांचे वेधले लक्ष - याबाबत स्नेहालयच्या डॉ. प्राजक्ता कुलकर्णी आणि हनीफ शेख यांनी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री, मनेका गांधी यांना ई मेल पाठवून संपूर्ण माहिती दिली. त्यांनी केंद्र शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेतून कळीला आर्थिक व वैद्यकीय मदत जाहीर केली. पण कळीसह तिचे संपूर्ण कुटुंबच सध्या फरार आहे. हे कुटंुब शोधण्यात शासकीय यंत्रणा मदत करायला तयार नाहीत. चाईल्डलाईन व स्नेहालयने एक स्वतंत्र पथक कळी व तिच्या कुटुंबाच्या शोधासाठी कार्यरत केले आहे. मात्र, त्यात अद्याप यश आलेले नाही.
सोमवारी करणार निदर्शने - बलात्कारित कळीला सातत्यपूर्ण वैद्यकीय उपचार व औषधोपचारांची आवश्यकता आहे. रोजंदारी करणाऱ्या व व्यसनी, अशिक्षित आई-वडिलांकडून कळीची सुश्रुषा नीटपणे होण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे कळीचे जीवन टांगणीला लागले असावे, अशी भीती चाईल्ड लाईन आणि स्नेहालय परिवाराला वाटते. कळीच्या प्रश्नात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी (५ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व बालसेवी व सामाजिक संस्था निर्देशने करणार आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget