728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अति मद्यसेवनामुळे तरवडीत एकाचा बळी

नेवासे । DNA Live24 - बनावट दारुकांडामुळे जिल्ह्यात एकापाठोपाठ बळी गेले असताना नेवासे तालुक्यातही बुधवारी एक बळी गेला आहे. तरवडी येथील बिबन इब्राहिम सय्यद (वय ३२) या तरूणाचा अति मद्यसेवनाने मृ्त्यू झाला. याच गावातील आणखी दोघांना अतिमद्यसेवन केल्यामुळे नगरच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात अाले आहे. सय्यद याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण मात्र पोलिसांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही.

तरवडीतील या घटनेमुळे पोलिस प्रशासन व राज्य दारू उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला आहे. या प्रकरणी भेंडे –कुकाणे सीमेवर असलेल्या एका हॉटेलला पोलिसांनी सील ठोकले आहे. नसीर इस्माईल सय्यद व छबू ऊर्फ प्रशांत भाऊसाहेब विधाटे (रा. तरवडी) अशी इतर उपचार घेत असलेल्या दोघांची नावे आहेत. यापैकी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नसीरची परिस्थिती नाजूक असल्याचे समजले आहे. मृत बिबन हा बांधकाम मजूर असून त्याला एक मुलगा व दोन मुली आहेत.

दरम्यान, तरवडीतील दारुकांडाप्रकरणी नेवासे पोलिसांनी गावातल्या चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत बिबनला गेल्या चार दिवसांपासून अतिमद्यसेवनाचा त्रास होत होता, असे त्याच्या कुटंूबियांनी सांगितले. बिबनला मंगळवारी कुकाण्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावतच गेल्याने बुधवारी सकाळी त्याला नगरला हलविण्यात आले मात्र वाटेवरच त्याने प्राण सोडला.

अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध झालेल्या नसीरला विळद घाटातील विखे पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत तो बेशुद्धावस्थेतच होता. तर छबूच्या डोळयांवर बनावट दारूचा परिणाम झाला आहे. पांगरमलच्या घटनेत जशी परिस्थिती मद्य सेवन करणायांची झाली होती. प्रथमदर्शनी तशीच अवस्था तरवडीतील रूग्णांची झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून वरिष्ठ पोलिस अधिकारी कुकाण्यात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तळ ठोकून होते.

दारूच्या बाटल्या नेमक्या कोठून उपलब्ध झाल्या, याचा शोध घेत असताना भेंडे शिवारात असलेल्या एका हॉटेलातून हा माल खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित हॉटेलला सील ठोकले आहे. तरवडीतही अतिमद्यसेवनामुळे एकाचा बळी गेल्यानंतर ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीसंबंधी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच तरवडीतून दारूचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय तरवडीतील तरूणांनी आज घेतला.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अति मद्यसेवनामुळे तरवडीत एकाचा बळी Rating: 5 Reviewed By: DNA Live24