728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

पशु-पक्षांच्या बचावासाठी सरसावले जुनेद व तौसिफ

जामखेड । DNA Live24 (सत्तार शेख) - गतवर्षीच्या भीषण दुष्काळाच्या आठवणी ताज्या असताना, यंदाही पाणीटंचाईची झळ पुन्हा बसणार का ? याबाबत जनतेच्या मनात धडकी भरली आहे. माणसाचे काय होईल ते होईल. पण, पशु-पक्ष्यांना उन्हाळ्याच्या भीषण झळा बसु नयेत, यासाठी गेल्या दोन वर्षापासुन काम करत असलेले जुनेद व तौसिफ हे दोन चिमुकले विद्यार्थी यंदाही पशु-पक्षांच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत.

मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेला जामखेड तालुका राज्याच्या पटावर कायम दुष्काळी म्हणुन ओळखला जातो. मागील काही वर्षात तालुक्यात पडलेल्या भीषण दुष्काळाने जनतेचे कंबरडेच मोडले होते. पाण्यासाठी मैलोंमैलांची भटकंती. टँकरचे पाणी मिळवण्यासाठी होणारा संघर्ष तालुक्यातील जनतेने अनुभवला. मागील वर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला. या पावसाने तालुक्यातील अनेक लहान मोठे तलाव भरले गेले. पण गेल्या तीन चार वर्षापासुन पडलेल्या भीषण दुष्काळामुळे मागील वर्षी दमदार झालेल्या पावसाने दुर होणार का ? हा सवाल जनतेसमोर आहे.

मार्च महिन्याच्या प्रारंभीच अनेक प्रकल्पांनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. अनेक प्रकल्पातील पाणी अजुन केवळ महिना दिड महिना पुरेल. पण, ऐन मे महिन्याच्या कडक उन्हात तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता दिसु लागली आहे.

पाणी टंचाईमुळे पशु पक्षांची होणारी हाल थांबावी, जैवसंपदा वाचावी यासाठी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या जुनेद सय्यद (इयत्ता सहावी) व तौसिफ शेख (इयत्ता तिसरी ) या दोघा विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षापासुन आपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडावर पशु पक्षांसाठी पिण्याचे पाणी व चारा ठेवण्याचा उपक्रम राबवायला सुरवात केली.

यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्षे आहे. मागील दोन वर्षात पक्षांसाठी सुमारे १०० किलो तांदुळ, ५० किलो गहु, २५ किलो ज्वारी, इतके धान्य पक्षांसाठी ठेवण्यात आले होते. हे धान्य विशेष कार्यकारी अधिकारी लतिफभाई शेख यांनी या दोन चिमुकल्यांना उपलब्ध करून दिले होते.

एकिकडे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवांचा अभाव असल्याचे म्हटले जात असतानाच जुनेद व तौसिफ या दोन चिमुकल्यांनी प्रयोगवन प्रकल्पाचे प्रमुख सत्तार शेख यांच्यापासुन प्रेरणा घेऊन सुरू केलेला पक्षी बचाव उपक्रम शाळेय विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आदर्श ठरत आहे.

तुम्हीही साथ द्या -  यंदाचा उन्हाळा गेल्या वर्षीसारखाच कडक जाणार अशीच चिन्हे दिसु लागली आहेत. यामुळे अागामी काळात पशु पक्षांची अन्न पाण्यावाचुन जीव जाऊ नये, त्यांचे हाल होऊ नये, यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी पशु पक्षांसाठी छोटे छोटे पाणवठे व चाऱ्याची सोय करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा – जुनैद व तौसिफ.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: पशु-पक्षांच्या बचावासाठी सरसावले जुनेद व तौसिफ Rating: 5 Reviewed By: DNA Live24