History of Maharashtra

चला करुया 'स्त्री शिक्षणाचा जागर'


महिला दिन विशेष । DNA Live24 -

स्त्री म्हटलं कि तिचा दुबळेपणाच आपल्या समोर येतो. पण सद्यस्थितीत गेल्या काही वर्षांपासून 'स्त्री' ची व्याख्याच बदलून गेलीय. तिने अवकाशात उत्तुंग भरारी घेतली आहे अगदी एखाद्या कंपनीमध्ये CEO सारख्या पदावर विराजमान होण्याबरोबरच फायरब्रिगेड सारख्या जीवघेण्या क्षेत्रातही ती पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहे. पण येथील व्यवस्थेला ते मान्य नसल्याचे दिसते. कारण तिच्या क्षमतेवर, तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिह्न उपस्थित केलं जातेय.

स्त्री ही त्याग, नम्रता, सुजाण व सुसंस्कृतपणा यांची मुर्ती. आज प्रत्येक क्षेत्रात धडाडी घेणा-या स्त्रीला प्रत्येक गोष्टीत आव्हाने आहेत. चूल मूल संभाळण्याच्या कामात तिला गुरफटून ठेवले गेलंय. आजही तिची योग्यता, अधिकार, जबाबदारी यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. घराच्या आत काम करणा-या व घराबाहेर नोकरी करणा-या स्त्रीयांची हिच स्थिती आहे. सगळीकडे हेच चित्र पहायला मिळतं, अगदी मीही त्यातलीच एक.

जगातील वेगवेगळया संस्कृतीत स्त्रीयांना किती क्रूरपणे वागवल गेलं आहे, याचं चित्रण आपल्याला बहुतेक वेळा चित्रपटातून पाहायला मिळतं आणि त्याविषयी आपल्याला वेदनाही होतात. पण रोजंच आपल्या अवतीभोवती ज्या क्रूर घटना घडतात, त्याकडं मात्र आपलं दुर्लक्ष असतं. स्त्रीयांनी कपडे कुठले घालायचे, कुठे जायचे, कुठं जायचे नाही, लग्न कुणाशी करायचे, अशा अनेक गोष्टीवर बंधने घातली जातात. शहरी भागात थोडीफार परीस्थिती बदलेली असली, तरी ग्रामीण भागात अजुनही हेच चित्र पाहायला मिळतंय. ग्रामीण भागात आजही शिक्षणच्या बाबतीत स्त्रीयांची हेळसांडच होत आहे. अर्थाजनाच्या संधीही डावलल्या जात आहेत.

समाजव्यवस्थेने पुर्वीपासूनच स्त्रीवर प्रत्येक बाबतीत बंधने घातली आहेत. साधा तिला तिचा जोडीदार निवडायचाही अधिकार नाही. आपल्याला विशिष्ट वेळी मूल हवंय अथवा नको, हे ठरवण्याचा अधिकारदेखील तिला असतोच असं नाही. लग्नाआधी वडिल, भाऊ व वडीलधारी मंडळी, लग्नानंतर नवरा व म्हातारपणी मुलगा, अशा एक ना अनेक नात्याने पुरूष स्त्रीवर पुरुषी अहंकार गाजवत आलाय. स्त्रीकडे आपल्या समाजाने नेहमीच दुबळं म्हनुण पाहिलं आहे व पहात आहे.

घरात जर स्त्रीला एकापाठोपाठ मुली झाल्या तर तिला व तिच्या मुलींना हीन वागणूक दिली जाते. परंतु हे कधीच लक्षात घेतलं जात नाही, की मूलगी होण्याला स्त्री नाही तर पुरुषही तेवढाच जबाबदार आहे. गर्भलिंगचिकित्सेवर सरकारने बंधी घातली आहे. गर्भलिंगचिकिस्ता उघडपणे होत नसली तरी छुप्या पध्दतीने सुरुच आहे. मग काय मुलीचा गर्भ आहे, हे समजताच तिला फेकून दिलं जातं, अशी मानसिकता आहे आपल्या समाज व्यवस्थेची !

एकविसाव्या शतकात अजुनही स्त्री -पुरुष भेदभाव केला जातो. मुलांना वंशाचा दिवा म्हनुण वाढवलं जातं. परंतु मुलगी म्हणजे परक्याचं धन म्हणून नेहमीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. समाज मुलीला वंशाची पणती म्हणून  का पाहत नाही ?

आजच्या शतकात स्त्रीयांकरता अनेक कायदे आहेत. परंतु हे कायदे फक्त कागदावरच राहिले आहेत. प्रत्यक्षात यावर अंमलबजावणी होत नाही. स्त्री संरक्षणासाठी कार्य करणा-या अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतु तिच्या अन्यायाला वाचा फुटत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.

असं म्हणतात, की जेव्हा स्त्री एखादं काम करायच ठरवते. तेव्हा ती तडीस नेऊनच स्वस्थ बसते. तिने ठरवलं  तर समाजात हुंडा, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या बुरसटलेल्या चालीरितींना नक्कीच आळा बसेल. पण हे तेव्हाच घडेल, जेव्हा स्त्री पुर्णपणे शिक्षित असेल व अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल. शिक्षणामुळे स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो, ती निर्भीड होते व तिला सगळया गोष्टी माहीत होतात. एक आनंदी व शांत स्री समाजाला खुप काही देऊ शकते. म्हणूनच महिला दिनाच्या औचित्याने स्त्री शिक्षणाचा जागर करूया. कारण सर्व आजाराचं जालीम औषध शिक्षण हेच आहे.

- विद्या खाडे ( पत्रकार)
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget