History of Maharashtra

लष्करे गँगच्या शार्पशुटर प्रविण खरचंदचे पलायन

अहमदनगर । DNA Live24 - नेवाशातील कुख्यात लष्करे गँगचा शार्पशुटर तसेच अॅड. रियाज पठाण यांच्या खून खटल्यातील मारेकरी प्रविण पोपट खरचंद (रा. नेवासे) हा रविवारी पहाटे जिल्हा रुग्णालयातुन पळाला. एका शस्त्रक्रियेसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवून बेड्या काढून तो पळाला. याच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार तथा कुख्यात गुंड सोपान गाडेही दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आहे.

सप्टेंबर २०१३ मध्ये नेवासे तहसील कचेरीच्या आवारात असलेल्या पोलिस ठाण्यासमोरच प्रविणने वकील रियाज जमशेद पठाण (४९) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. हत्येनंतर तो स्वत:हून पाेलिस ठाण्यात हजर झाला. आपण अल्पवयीन असून नुकताच खून केल्याची कबुली त्याने दिली होती. एलसीबी टीमने या गुन्ह्याचा तपास करुन अकरा आराेपींला अटक केली होती. नंतर प्रविण अल्पवयीन नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यालाही या गुन्ह्यात अटक झाली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच होता.

गेल्या महिन्यात अॅड पठाण खून खटल्याची नियमित सुनावणी श्रीरामपूर सत्र न्यायालयात सुरु झाली. त्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पहात आहेत. या खून प्रकरणात प्रविणसह मोहन सुरेश लष्करे, आबाजी उर्फ भगवान रामेश्‍वर गाडे, चौरंगीनाथ गोरखनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुला, सचिन चंद्रकांत चव्हाण, सादिक बशीर  शेख, अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे, विलास पोपट जिरे, व सोपान भगवान गाडे या १२ आरोपींचा समावेश आहे. 

यातील सादिक बशीर शेख हा आरोपी अगोदरच पसार होता. नंतर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी सोपान गाडे हा नगर येथून पळाला होता. आता प्रविण खरचंदही पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला आहे. प्रविणसह इतर आरोपींना काही दिवसांपासून सबजेलमध्ये ठेवलेले होते. त्याला डोळ्यांचा त्रास असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवले होते. बंदोबस्तासाठी मुख्यालयातील दोन पोलिस कर्मचारीही होते. पहाटेच्या वेळी त्यांची नजर चुकवून प्रविणने पळ काढला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget