History of Maharashtra

अहमदनगर कन्या पुरस्कारांचे थाटात वितरण


अहमदनगर । DNA Live24 - समाजातल्या शोषितांसाठी, उपेक्षितांसाठी, दुर्लक्षितांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत जीवनसाथी म्हणून जगणे म्हणजे आपल्या पदरात निखारा घेवून संसार करण्यासारखेच आहे. पदरात निखारा आहे, म्हणजे चटके,फटके, दाहकता आलीच. ते सहन करणाऱ्या या सावित्रीच्या लेकींना अहमदनगर कन्या पुरस्काराने सन्मानित करणे, म्हणजे विविध संस्था संघटनांच्या वतीने केलेला सलाम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी केले.

शहर स्थापना दिनानिमित्त रहेमत सुलतान फाऊंडेशन व विविध संस्थांच्या वतीने अहमदनगर कन्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. गेल्या वीस-तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभ्या असलेल्या, सर्व प्रसंगी साथ देणाऱ्या, पतीच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक जीवन जगणाऱ्या पत्नींना प्रधान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव देवढे होते.

यावेळी मंचावर स्मिता पानसरे, पोलिस उपनिरीक्षक कल्पना शिरदावडे, संस्थेचे अध्यक्ष युनुस तांबटकर, सचिव एजाज खान होते. या वेळी शहेनाज महेबुब सय्यद, ज्योत्स्ना नानासाहेब कदम, शमीम आसिफ खान, उज्वला बहिरनाथ वाकळे, कल्पना विठ्ठल बुलबुले, रेश्मा नादिर खान, शकुंतला अनंत लोखंडे, यशोधरा नितीन बनसोडे, यास्मिन हनिफ शेख, शालन दत्ता वडवणीकर, हेमलता जालिंदर बोरुडे, डॉ. शमा फारुकी, वर्षा संदीप कुसळकर या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्मिता पानसरे म्हणाल्या, अहमदनगर कन्या पुरस्कार म्हणजे जिच्यावर कुटुंब उभे आहे, जिच्यात संयम आहे, जिला अनेक तडजोडी करावे लागले व लागते, जी बरच काही सोसते आहे, यापुढेही सोसावे लागणार अशा कुटुंबाच्या कण्याचा सन्मान आहे. म्हणून या महिला कार्यकर्त्याच्या पाठीशी नव्हे, तर बरोबरीने उभ्या आहेत. किंबहुना स्त्री म्हणून ती एक पाऊल या कार्यकर्त्यांच्या पुढेच आहेत. कारण आपल्या पिढीचे मूल्य येणाऱ्या नव्या पिढी मध्ये रुजवण्याचा काम आई म्हणून ती करीत असते.

प्राचार्य देवढे म्हणाले, प्रसिद्धीपासून दूर असलेल्या, पडद्याच्या मागे असलेल्या मात्र कर्तुत्ववान असलेल्या महिलांचा गौरव करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. ती रहेमत सुलतान फाऊंडेशन व शहरातील विविध संस्थांनि चांगल्या पद्धतीने पार पाडली. कार्यकर्त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी समाज आहे, समाजातील संस्था संघटना आहेत, हा संदेश या कार्यक्रमाने दिला. सत्कारार्थींनी व त्यांच्या पतींनी आपल्या समोर सावित्रीबाई व ज्योतिबा फुले या जोडप्याचे जीवन आदर्श म्हणून ठेवावे.

कार्यकर्ता नवरा हा वेळापत्रक नसलेला प्राणी असतो. त्याला वेळेच भान नसतं याची जाणीव पत्नीने ठेवावी. तसेच आपल्यासाठी, कुटुंबासाठी रात्रंदिवस कष्ट उपसणाऱ्या पत्नीच्या कष्टाची जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

रहेमत सुलतान फाऊंडेशनसह वक्ता मंच, मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, मुस्कान सोशल वेलफेअर, पद्मकन्या समिती, आदी संस्थाचा सहभाग होता. आबिद खान, संध्या मेढे, शफाकत सय्यद, नादिर खान, तिरमलेश पासकंटी, यांनी कार्यक्रमासाठी कष्ट घेतले. पाहुण्यांचे स्वागत सचिव एजाज खान यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष युनुस तांबटकर यांनी केले. सूत्रसंचालन शिवानी शिंगवी व आदित्य वडवणीकर यांनी केले. आभार प्रदर्शन तारिक शेख यांनी केले.

दाभोलकर, पानसरेंना समर्पित - पुरस्कारार्थीच्या वतीने मनोगत व्यक्त करताना कल्पना बुलबुले म्हणाल्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हे आमचे वैचारिक पोशिंदे होते. आमच्या कुटुंबाचे वडिलधारी होते त्यांची हत्या वेदना देणारी आहे. अस्वस्थ करणारी आहे. हत्येच्या काळात शैलजाकाकू दाभोलकर व उमाकाकू पानसरे यांना जे सहन करावे लागले, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांच्या असीम त्यागाला आम्ही सर्वजनी आम्हाला मिळालेला पुरस्कार समर्पित करतो.
कॉर्पाेरेट समाजसेवा - किरण मोघे म्हणाल्या, बाईचे श्रम, हे श्रम मानले जात नाही. तिच्या घरातील कष्टाचे मूल्य होत नाही, हे दुर्दैव आहे. समाजकार्य आजकाल कॉर्पोरेट होताना दिसत आहे. फंड असेल तर सामाजिक काम फंड नसेल तर सोशल काम नाही. या कॉर्पोरेट सोशल कामामुळे मूल्याधारित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्यक्त होणे कठीण झाले. व्यवस्थेला विरोध करणे लांब राहिले साधा निषेध व्यक्त करणे कठीण झाले आहे. हे वातवरण बदलण्याचे काम आपल्याला सर्वांना करावा लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget