History of Maharashtra

इच्छाशक्ती असेल तर युपीएससीत यश सहज शक्य


अहमदनगर । DNA Live24 - बालवयात डोळ्याची दृष्टी गेली. कमला मेहता अंध विद्यालयात वसतिगृहात राहून शिकले. सेंट झेव्हिअर्समध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. अनेक अडचणींवर मात करुन वर्ष २०१५ व २०१६ मध्ये २ वेळा युपीएससी  उत्तीर्ण झाले. डोळस नसूनही कधी अंधत्वाचे भांडवल, सहानुभूती मिळवली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासू वापर व स्वतःची सर्वोच्च इच्छाशक्ती असेल तर युपीएससीमध्ये यश सहज शक्य आहे, असे प्रतिपादन देशातील पहिल्या महिला आयएएस प्रांजल पाटील यांनी केले.

सावेडीतील माऊली सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लोकनायक अण्णा हजारे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित साद प्रेरणेशी, संवाद दुर्दम्य आशावादाशी, उपक्रमाअंतर्गत प्रांजल पाटील यांच्या संवादाचे आयोजन केले होते. स्नेहालय परिवाराच्या दिव्यांग पुनर्वसनातील स्वयंसेवी संस्था अनामप्रेम, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, सक्षम स्पर्धा परीक्षा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अंध असूनही युपीएससी परीक्षेत यश कसे मिळवायचे याबाबत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाई च्या मार्गदर्शन प्रांजल पाटील यांनी केले. यावेळी प्रांजल पाटील यांचा नागरी सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आणि अनामप्रेमच्या प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगतात प्रांजल पुढे म्हणाल्या, युपीएससीसाठी जॉज या संगणक सोफ्टवेअरचा पुरेपूर उपयोग केला. वयाच्या ६ व्या वर्षी एका डोळ्याला अंधत्व आले. दोनच वर्षांनी म्हणजे वयाच्या ८ व्या वर्षी दुसऱ्या डोळ्याची दृष्टी गेली.

पण, आई-वडीलांच्या पाठिंब्यामुळे शिक्षण घेतले. राज्यशास्त्र विषयात एमए, एमफील केले. जेएनयु विश्वमहाविद्यालयात युपीएससीचा खूप अभ्यास केला. इंटरनेटचा अधिकाधिक वापर स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी नक्की होतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तसेच स्नेहालय प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांनी पाटील यांना स्पर्धा परीक्षेबाबत अनेक प्रश्न विचारले. पाटील यांनी त्यांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अजय धोपावकर यांनी केले.

धोपावकर यांनी अनामप्रेमची प्रकाशवाटा व प्रकाशवाणी या मासिकांची दिव्यांग पुनर्वसनात गरज, सरकारी नोकऱ्यामध्ये दिव्यांग अनुशेष भरतीची मागणी, अपंग प्रमाणपत्राची नवीन पद्धत, विधिमंडळात दिव्यांगाना प्रतिनिधित्व, याबाबत विचार मांडले. यावेळी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी स्पर्धा परीक्षा हा देशसेवेचा उत्तम मार्ग असल्याचे सांगितले. सक्षम अकादमीचे डॉ. भरत करडक यांनी अनामप्रेमच्या रीडर-रायटर क्लबची यावेळी घोषणा केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अविनाश बुधवंत हे होते. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचे अध्यक्ष सुजित माने, अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने ,उपाध्यक्ष नाना भोरे, सचिव सुभाष शिंदे, स्नेहालयचे सुवालाल शिंगवी, संजय हरकचंद गुगळे, नंदेश शिंदे, प्रकाशवाटा व प्रकाशवाणी विभागाच्या अनुजा कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन राधिका मुळे यांनी केले. आभार नंदेश शिंदे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वितेसाठी नितीन वावरे, मीना भिंगारदिवे, उमेश पंडूरे, प्रदीप कुंभार, भारती सोनवणे, सचिन गारदे यांनी परिश्रम घेतले.

प्रांजल महाराष्ट्राचा कोहिनूर - प्रांजल पाटील यांच्या आई व वडिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अत्यंत भावूक वातावरणात प्रांजल यांच्या आईने अंध प्रांजलचा संघर्ष सांगितला. यामुळे धडधाकट तरुण मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेत  यश मिळवणे खूप सोपे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. यावेळी प्रांजल माझ्या पोटचा हिरा आहे, असे त्या म्हणाल्या. त्यावर सूत्रसंचालिका मुळे यांनी प्रांजल महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा असल्याचे म्हणताच संपूर्ण सभागृहाने उभे राहून प्रांजल यांच्या माता-पित्यांना अभिवादन केले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget