728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

झेंडीगेटला अवैध कत्तलखान्यावर छापा


अहमदनगर । DNA Live24 - झेंडीगेट परिसरात कुरेशी मस्जिदीजवळ एका अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी पकडले. ३ जिवंत जनावरांची पोलिसांनी सुटका केली. तर एक आरोपी मात्र पळून गेला आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली.

झेंडीगेट परिसरात कुरेशी मस्जिदीजवळ अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती एएसपी अक्षय शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे एएसपी शिंदे, हेड कॉन्स्टेबल दगडु शिंदे, भालसिंग, प्रमोद जरे, पोलिस नाईक युवराज गिरवले, सचिन जाधव, संतोष ओहोळ, कॉन्स्टेबल अभिजीत अरकल, सुपेकर, कोतवालीचे एपीआय प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल पवार, रविंद्र घुंगासे यांनी छापा टाकला. बंद गेटच्या पत्र्यांच्या खोलीत असलेल्या बंदिस्त जागेमध्ये एक कत्तलखाना सुरू होता.

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तिघे जण रंगेहात मिळाले. एका खाेलीत तीन जनावरे दाटीवाटीने चारापाण्याची सोय न करता बांधलेली होती. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यात इस्तेपाक अल्लाउद्दीन बेपारी (२६, मस्तान चौक, नगर), शहाबाज अनवर कुरेशी (२२, हमाल वाडा, झेंडीगेट), जाकीर इकबाल कुरेशी (१९, नालबंद खुंट) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

१२ हजार रुपये किंमतीचे मांस, १३ हजार रुपये किंमतीची गोवंशीय जनावरे, २ लाख रुपयांचा पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो (क्र. एमएच १२ जेएफ ३१५४), असा सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. ठवाळ यांना बोलावून मांसाचे नमुने तपासणीसाठी सीलबंद केले. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मांसाची विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. जिवंत जनावरांची पांजरपोळमध्ये रवानगी करण्यात आली.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी युवराज गिरवले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन ७ जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम १९९५, प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: झेंडीगेटला अवैध कत्तलखान्यावर छापा Rating: 5 Reviewed By: DNA Live24