History of Maharashtra

ग्रामपंचायत निवडणूकांवरही आता निवडणूक आयोगाची नजर

निवडणुका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या सीमेलगतच्‍या गावांमध्‍येसुध्‍दा आचारसंहिता लागू राहील.


मुंबई । DNA Live24 - ग्रामपंचायतीची मोठी संख्‍या व त्‍यांची वैशिष्‍टये लक्षात घेता आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी आवश्‍यक त्‍या सर्व  उपाययोजना कराव्‍यात. आवश्‍यकतेप्रमाणे  जिल्‍हा, उप विभाग,  तालुका इत्‍यादी स्‍तरावर पथके तयार करावीत व त्‍यामध्‍ये योग्‍य असे अधिकारी नेमण्‍यात यावेत. गावामध्‍ये असलेले इतर शासकीय अधिकारी ( ज्‍यांची निवडणूकीच्‍या थेट कामामध्‍ये नियुक्‍ती  करण्‍यात आली नसेल)  यांची मदत घेता येईल. असे निर्देश राज्‍य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

स्‍थानिक नागरिकांची बैठक आयोजित करुन त्‍यांना आदर्श आचारसंहितेतील सूचनांबाबत अवगत करुन त्‍यांचे काटेकोरपणे पालन करण्‍याबाबत आवाहन करावे.  प्राप्‍त झालेल्‍या  तक्रारींचा तपशील व्‍यवस्थित ठेवावा व वस्‍तूनिष्‍ठपणे आढावा घेण्‍याची व्‍यवस्‍था करावी. संवेदनशील भागात व्‍हीडिओ कॅमेरा वापरण्‍याबाबत  परिस्थितीनुरुप निर्णय घ्‍यावा. कोणत्‍याही  परिस्थितीत अचारसंहितेचे उल्‍लंघन होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती सर्व उपाययोजना करण्‍यात यावी.  आदर्श आचारसंहितेचे उल्‍लंघन झाल्‍याची बाब राज्‍य निवडणूक आयोगास आढळून आल्‍यास, त्‍याची जबाबदारी जिल्‍हा प्रशासनाची असेल.

तहसील क्षेत्रामधील सर्व ग्रामपंचायतींच्‍या निवडणूकांमध्‍ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांना पर्यवेक्षणाची जबाबदारी देण्‍यात यावी. सार्वत्रिक निवडणूका  असलेल्‍या ग्रामपंचायतींमध्‍ये  निवडणूक कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या  वेळेपासून , निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत आचारसंहिता लागू राहील.  निवडणुका निर्भय, मुक्‍त व पारदर्शक  वातावरणामध्‍ये होणे आवश्‍यक असल्‍याने, राज्‍य निवडणूक  आयोगाने 14 ऑक्‍टोबर, 2016  रोजी आचारसंहिता विषयक निर्गमित केलेल्‍या  आदेशातील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.

आचारसंहिता खालील ग्रामीण क्षेत्रामध्‍ये लागू राहील -  
ज्‍या जिल्‍हयामध्‍ये 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा  अधिक ग्रामपंचायतींच्‍या  सार्वत्रिक निवडणूका आहेत  त्‍या संपूर्ण जिल्‍हयामध्‍ये  आचारसंहिता लागू राहील. ज्‍या तालुक्‍यात 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्‍या संपूर्ण तालुक्‍यात  आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या सीमेलगतच्‍या गावांमध्‍येसुध्‍दा आचारसंहिता लागू राहील.

आदर्श आचारसंहिता जरी संपूर्ण जिल्‍हा, तालुका, लगतच्‍या गावामध्‍ये लागू असली, तरी ज्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणुका नसतील, त्‍या ठिकाणी विकासाच्‍या विविध कामांवर कसलाही निर्बंध  राहणार नाही.  मात्र या क्षेत्रात अशी कोणतीही कृती कोणालाही करता येणार नाही, ज्‍यामुळे  निवडणुका होणा-या  ग्रामपंचायतीच्‍या मतदारांवर विपरीत प्रभाव पडेल. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालय परिसरात  (प्रामुख्‍याने तहसील कार्यालय) व त्‍याच्‍या संरक्षक भिंतीपासून 100 मीटरच्‍या परिसरात निवडणुका जाहीर झाल्‍यापासून  मतमोजणीपर्यंत जमावबंदी लागू करण्‍यात यावी.  नामनिर्देशनपत्र  दाखल करण्‍यासाठी आलेल्‍या  उमेदवारासोबत 3 किंवा अधिक व्‍यक्‍ती असू नयेत.

ग्रामपंचायत क्षेत्रामध्‍ये प्रत्‍येक प्रभागासाठी उमेदवाराला एक प्रचार कार्यालय उघडण्‍याची  परवानगी असेल, यासाठी आवश्‍यक तो विद्युत पुरवठा उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत महावितरण विभागाकडून उमदेवाराने रितसर परवानगी प्राप्‍त करुन घ्‍यावी.  एका उमेदवारास प्रचारासाठी एक चार चाकी किंवा दोन दुचाकी  वाहनाची परवानगी देण्‍यात यावी व एका उमदेवाराने प्रचारासाठी परवानगी घेतलेले वाहन दुस-या उमेदवारास वापरता येणार नाही. तालुकास्‍तरीय  आचारसंहिता  पथकाने वाहनासाठी परवानगी देताना त्‍या वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र, कर भरलेले पुस्‍तक तपासून मग परवानगी द्यावी.

ग्रामपंचायत निवडणुक  काळामध्‍ये  ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणा-या वाडया, पाडे, वस्‍त्‍या  या ठिकाणी  मद्य व मटणाच्‍या पार्ट्या  चालतात. त्‍यामुळे राज्‍य  उत्‍पादन शुल्‍क  विभागाने या वाडया, पाडे व वस्‍त्‍यांवर स्‍थानिक पोलिसांच्‍या सहकार्याने गस्‍त घालावी व मद्य उत्‍पादनासाठी  लागणारा कच्‍चा माल, काळ गूळ, नवसागर इत्‍यादी पदार्थाची साठवण करणा-या व्‍यापा-यांवर  नजर ठेवावी. विशेषतः किनारापट्टीच्‍या भागातील खारफुटीच्‍या जंगल भागामध्‍ये गस्‍त वाढवावी, अशा सूनाही देण्यात आल्या आहेत.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget