Header Ads

 • Breaking News

  DNA Live24 वाचकांच्या सेवेत दाखल


  राठी पत्रकारितेने स्वातंत्र्यलढ्यात जनसामान्यांचे विषय हाताळले. परकीय सत्तेविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे मराठी पत्रकारितेला दैदिप्यमान इतिहास आहे. तरीही त्या काळात मराठी वृत्तपत्रे सामान्यांच्या हातातील दैनंदिन वस्तू नव्हती. अत्यल्प शिक्षणाचे प्रमाण, क्रयशक्तीचा अभाव, या कारणांमुळे वर्तमानपत्र वाचनाची ‘चैन’ करणे अनेकांना शक्य नव्हते. मूठभर वाचकांच्या भरवशावर चिमुटभर वृत्तपत्रे चालत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही परिस्थिती फार बदलली नव्हती. अनेक नवी वर्तमानपत्रे निघाली. तर बरीचशी मध्येच बंद पडली. जी वर्तमानपत्रे टिकली ती राजश्रयाच्या आधारावर. ज्या वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातींचा वरदहस्त लाभला, त्यांना स्पर्धेत टिकाव धरता आला. याला काही अपवाद होते.

  सन १९८० पासून छपाईच्या क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले. त्यामुळे मराठी वृत्तपत्रांची संख्या झपाट्याने वाढली. पण, वृत्तपत्रांचा खप मात्र फारसा वाढला नाही. याच काळात दृक-श्राव्य माध्यमांचा उदय झाला. खाजगी वृत्तवाहिन्या आल्यानंतर मात्र प्रेक्षकांची संख्या झपाट्याने वाढली. मुद्रित माध्यमांच्या दुपटीहून अधिक लोक, दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करतात, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे लिहिता वाचता न येणारा मोठा वर्ग माध्यमांच्या संपर्कात आला. १९९० नंतरचा काळ हा मराठी माध्यमांच्या विकासाचा सुरुवातीचा काळ मानता येईल. याच पत्रकारितेने आता व्यावसायिक रूप धारण केलेले दिसत आहे. 

  वर्तमानपत्रे दिवसभराच्या बातम्या गोळा करून रात्री छापली जातात. ते वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी सकाळी वाचकांच्या हातात पडते. एकंदरित बातमी घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाचकांना कळते. आता वाचकांना एवढा विलंब मान्य नाही. मुद्रित माध्यमे जिल्हा पुरवण्या काढू लागल्यामुळे एका जिल्ह्यातील बातमी दुसऱ्या जिल्ह्यात राहणाऱ्यांना कळत नाही. त्यामुळे बातम्यांच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर लोक विसंबून राहतात. ‘ताजेपणा’ इलेक्ट्रॉनिक न्यूजचे हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे क्षेत्र लोकप्रिय झाले. इंटरनेटमुळे सर्व गैरसोय दूर झाली आहे. क्षणार्धात माहिती मिळणे शक्य झाले आहे. इंटरनेटवरील मराठी पत्रकारिता हे सर्वात नवे क्षेत्र आहे. हल्ली अनेक मराठी वृत्तसेवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

  सर्व प्रकारच्या बदलांचा मराठी वृत्तपत्रसृष्टीवर सखोल परिणाम होत आहे. नव्या बदलांचा स्वीकार करणे, त्यानुसार आपल्यात बदल करून घेणे, हीच काळाची व पत्रकारितेची गरज आहे. पत्रकारांनाही आता काळाची पावले ओळखून 'लोकल' ते 'ग्लोबल' अशा दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. हे भविष्य ओळखून DNA Live24 हे 'न्युज पोर्टल' अापल्या सेवेत दाखल होत आहे. सोशल मिडियाच्या जमान्यात बातमी सुपरफास्ट झाली आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुकमुळे घडलेली घटना क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. मात्र, याचे काही तोटेही आहेत. अशा माध्यमातून आलेली माहिती खरी असेलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांची वाट पहावी लागते.

  म्हणूनच वाचकांची ही गरज ओळखून DNA Live24 बातम्या सुपरफास्ट देणार आहे. त्याही विश्वासार्ह, सविस्तर आणि सर्व क्षेत्रातील असणार आहेत. अहमदनगर ते ग्लोबल असा या पोर्टलचा प्रवास असणार आहे. शिवजयंतीच्या मुहुर्तावर 'सुपरफास्ट बातम्या' देणारे हे 'पोर्टल' आपल्या सेवेत दाखल होत आहे. प्रशिक्षित, अनुभवी पत्रकारांनी सुरू केलेला हा नवखा प्रयोग आहे. मात्र, विश्वासार्ह, नेमकी आणि अचूक बातम्या देणारे संकेतस्थळ म्हणून DNA Live24 वाचकांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. बदलत्या काळानुरूप पत्रकारितेचे हे स्वरुपही स्वत:मध्ये बदल करत राहिल, अशी आम्ही ग्वाही देतो. कारण, सत्याशी प्रामाणिक आणि वाचकांशी एकनिष्ठ हेच आमचे मुख्य ध्येय असणार आहे. हा सर्वसामान्यांचा, दबलेल्या, पिचलेल्यांचा आवाज असेल, यात शंका नाही. धन्यवाद !

  - टीम  DNA Live24 .

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad