Header Ads

 • Breaking News

  ‘प्रतिबिंब’ दहा वर्षाचा होतोय..

  अहमदनगर । DNA Live24 - माध्यम क्षेत्रामध्ये सामान्याने काम करणे हे आजपर्यंत असामान्य अशी गोष्ट होती. व्यक्ती, जात आणि शहराची मक्तेदारी कायम माध्यम क्षेत्रावर राहिलेली दिसते. दिसणे, बोलणे, भाषा, उंची, रंग, वावरणे, उच्चारण, आवाज इत्यादी बाबतीत काही बंधने कायम मागासलेल्या किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेली आहेत. मराठी वृत्तपत्रात, मराठी सिनेमात किंवा मराठी भाषेतील माध्यमात काम करायचे असले तरीही माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या विभागात प्रवेश मिळण्यासाठी इंग्रजी आले पाहिजे हा अट्टाहास तथाकथित शुक्राचार्यांनी कायम ठेवलेला दिसतो. बहुजन समाज आजतागायत डी.एड., बी.एड. मध्येच अडकून पडले. याच्याशिवाय नोकरी असते हे समजायला २१ व्या शतकातही समजायला तयार नाही. मात्र बाकी परंपरेने विद्येची मक्तेदारी असलेले लोक सर्व प्रकारच्या नोकऱ्यांचा येथेच्च लाभ घेऊन बसलेले दिसतात.

  ग्रामीण भागातील विद्यार्थी माध्यमात काम करू शकतो हा विश्वास आता कुठे त्यांना यायला लागलाय. पण आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना पुणे- मुंबईत जाऊन शिक्षण व प्रशिक्षण घेणे अवघड आणि जिकीरीचे काम आहे. हेच लक्षात घेऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले. सन २००७ मध्ये संज्ञापन अभ्यास विभाग हा माध्यमाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम याच महाविद्यालयात सुरु करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमाचे रीतसर व प्रत्याक्षित पद्धतीने प्रशिक्षण मिळावे हा याचा हेतू होता. या अभ्यासक्रमामध्ये मुद्रित माध्यमे, प्रसार माध्यमे, जनसंपर्क, जाहिरात आणि संपूर्ण चित्रपट निर्मिती प्रक्रिया (पटकथा लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा, एडिटींग, प्रकाशयोजना) इत्यादीचा समावेश होतो. माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा तर या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे.

  बऱ्याच वेळा समाज आणि शिक्षण यांचा सहसबंध असत नाही. शिक्षण क्षेत्रातल्या अनेक गोष्टी तिथच राहतात. त्या समाजात पोहचत नाहीत. आजही हा दुरावा कायम आहे. ही बाब अगदी सुरुवातीलाच संज्ञापन अभ्यास विभागाच्या लक्षात आली. म्हणून या विभागाने महाविद्यालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील माहितीपट व लघुपट महोत्सव सुरु केला. विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेले माहितीपट व लघुपट इतर प्रेक्षकापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि शिक्षणाशी समाजाचा प्रत्यक्ष संबध आला पाहिजे या हेतूने ‘प्रतिबिंब’ या नावाने लघुपट व माहितीपट महोत्सव सुरु करण्यात आला. २५ जानेवारी २००८ रोजी पहिला महोत्सव आशा स्क्वेअर या चित्रपटगृहात पार पडला. त्या नंतर दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवास राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे स्वरूप देण्यात आले. कदाचित हे भारतातील पहिले महाविद्यालय असू शकेल जे दरवर्षी राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवाचे आयोजन करते.

  यंदा हे या महोत्सवाचे दहावे वर्ष. २०१३ पासून हा महोत्सव चित्र महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान तर मागील वर्षापासून १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान चार दिवस सकाळी ९ ते रात्री ९ यांच्या वेळेत आयोजित केला जातो. २०१२ पर्यंत फक्त लघुपट व माहितीपट महोत्सव आयोजित होत असे, पण त्या नंतर पहिल्या दोन दिवस पूर्ण लांबीचे चित्रपट दाखवायला सुरुवात केली. जगातील उत्तम चित्रपट व माहितीपट पाहण्याची संधी नगरकरांना मिळावी आणि त्यांचा चित्रपट पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा हा त्याचा उद्धेश आहे. अहमदनगर मधील चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपट संस्कृती खोलवर रुजावी आणि नवीन चित्रपट निर्मितीमध्ये येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन व्हावे हा या महोत्सवाचा मूळ उद्धेश आहे.

  संज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी ८० हून अधिक लघुशोध प्रबंध, १७० हून अधिक लघुपट व २० हून अधिक माहितीपट निर्माण केले आहेत. ‘फँड्री’ व नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपट सृष्टीतील विक्रमी दर्शक लाभलेला चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे, ‘ख्वाडा’ चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ऑडीयंस चॉइस अवॉर्ड’ प्राप्त चित्रपट ‘घुमा’ चा दिग्दर्शक महेश काळे, हे याच विभागाचे विद्यार्थी. त्यांचे पिस्तुल्या, तलप, वंचित, रुपया, इत्यादी लघुपट प्रेक्षकांनी याच महोत्सवात पाहिले. याशिवाय चित्रपट निर्मिताच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे गार्गी कुलकर्णी (वंश), संकेत पावसे (बापलेकी), भाऊसाहेब शिंदे (भूक), संभाजी सोनकांबळे (बंदूक), मुकुंद नाकील (चाचपड), गौरव राजळे (भारती), दादासाहेब शेळके (मुरळी मी देवाची), श्याम शिंदे (अव्यक्त), अजय थोरात (भंगारवाले) प्रमोद निक्रड (मुडान), सचिन धोत्रे (नंजूर) यांचे पुरस्कार प्राप्त लघुपटही याचे महोत्सवात प्रेक्षकांना पाहता आले.

  आजपर्यंत विजय पाडळकर, प्रसाद नामजोशी, डॉ. अनमोल कोठाडिया, मिलिंद शिंदे, विरेंद्र वळसंगकर, आदीनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले. या स्पर्धेसाठी भारतातील विविध विद्यापीठाबरोबरच एफ.टी.आय.आय. पुणे, सत्यजित रे फिल्म अँड टेलीविजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, कोलकता, व्हिसलिंग वूड्स मुंबई, धर्मशाला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, दिल्ली इत्यादी संस्थामधून व ठिकाणाहून माहितीपट व लघुपट येत आहेत. याच बरोबर या महोत्सवासाठी खुल्या गटातून लघुपट येण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

  पहिल्या महोत्सवासाठी फक्त ५० प्रेक्षकांची उपस्थिती होती. मागील वर्षी याच महोत्सवासाठी २५०० प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. या महोत्सवात पहिल्या दोन दिवस जगातील विविध देशातील निवडक चित्रपट दाखवले जातात. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चर्चा होते. जगातील उत्तम सिनेमा दाखवत असल्याने त्या-त्या देशातील संस्कृती, समाज आणि राजकीय व्यवस्था समजायला मदत होते. शेवटचे दोन दिवस लघुपट व माहितीपट दाखवले जातात.

  लघुपट व माहितीपट हे समाज वास्तव व्यक्त करण्याचे सर्वात उत्तम दृकश्राव्य माध्यम आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनाचा उत्सव नाही तर परीक्षक, समीक्षक, रसिक, विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे. सध्याची विद्यार्थी व तरुण काय विचार करतायत हे या महोत्सवातून पहायला मिळते. ८० टक्के तरुण प्रेक्षक या महोत्सवासाठी असतात. विभागातर्फे ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ शी संलग्नित ‘न्यू आर्ट्स डी.सी.एस. फिल्म सोसायटी’ चालवली जाते. याद्वारे वर्षभर दर शनिवारी जगातील वेगवेगळ्या देशातील उत्तम चित्रपट सभासदांना दाखवले जातात. त्यामुळे सिनेमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हायला मदत झालेली आहे. चांगले दर्जेदार चित्रपटाचे रसग्रहण करायला नगरचे प्रेक्षक तयार होत आहेत. अर्थात हा विभाग म्हणजे माध्यमात काम करणारे तरुण घडविण्याचा कारखाना नसून समाज आणि शिक्षण यांचे नाते घट्ट करणारे ठिकाण आहे हे मात्र नक्की.

  - प्रा. बापू चंदनशिवे
  विभागप्रमुख, संज्ञापन अभ्यास विभाग,
  न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad