Header Ads

 • Breaking News

  वाचकांनो.. लिहिते व्हा ! मोहिमेचा शुभारंभ

  अहमदनगर । DNA Live24 - साहित्याच्या वाचनातून वाचकाला विचार, भाषेची समृद्धता मिळते. त्या समृद्धतेतून लिखाण केल्यास चांगल्या विचारांचं प्रकटीकरण होते. टीव्ही, व्हाट्‌सऍपसारख्या साधनांमुळे समाजातील मुल्ये लोप पावत चालली असून, लेखकांनी त्यांच्या साहित्यातून मुल्यसंस्कृती समाजमनात रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले. साहित्य परिषदेने हाती घेतलेली वाचकांनो, लिहिते व्हा, ही चळवळ प्रभापिणे राबविण्यासाठी सर्व समाज घटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

  मराठी भाषा आणि साहित्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी साहित्य परिषदेच्या कार्यात लोक सहभाग वाढावा, या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेच्या वतीने ‘साहित्य रसिक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सु. प्र. कुलकर्णी, अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के, कार्याध्यक्ष किशोर मरकड, सल्लागार डॉ. लिला गोविलकर, केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे, कार्यवाह प्रा. डॉ. चं. वि. जोशी, उपाध्यक्ष डॉ. शरद सांब, प्रा. एन. बी. मिसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलनाने झाली. जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते यावेळी वाचकांनो, लिहिते व्हा.. या घोषवाक्य फलकाचे अनावरण करण्यात आले. 

  यावेळी जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, अनुभवांमधून चांगल्या विचारांचं प्रकटीकरण होत असते. लिखाण करताना भाषेतील शुद्धता, सौंदर्य महत्वाचे ठरते. लिहिण्यासाठी श्रवण महत्वाचे आहे. फक्त व्याकरणाचे ज्ञान असून उपयोग नाही तर, असलेल्या ज्ञानाचा प्रवावी वापर करणे गरजेचे आहे. टीव्ही, मोबाईल सारखी साधने आल्याने साहित्य निर्मिती थंडावली आहे. वकृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धासारखे उपक्रम कमी झाले. त्याचे पुनरुज्जीवन करता येऊ शकते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना काय आवडते? याचा विचार होणे गरजेचे आहे. पूर्वी घराघरात केले जाणारे संस्कार कमी झाले. एखादी व्यक्ती सुसंस्कृत नसल्यास, सुशिक्षित असूनही उपयोग नाही.

  अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के म्हणाले, बर्‍याच दिवसांपासून काहीतरी नवीन करण्याचा विचार होता. त्यानुसार साहित्य रसिक मेळाव्याची कल्पना सुचली. साहित्य रसिकांकडून सूचना, मार्गदर्शन घेऊन मसापच्या नगर शाखेचा ‘रोडमॅप’ तयार करण्यात येईल. शिवाजी महाराज हे सर्वोत्तम विचार प्रवर्तक असल्याने त्यांच्या जयंतीदिनी कार्यक्रम घेतला. विचारातून क्रांती घडते, विचार निर्मितीसाठी वाचावं लागतं. विचारांची शेवटची पायरी म्हणजे लेखन. त्यानुसार ‘वाचकांनो, लिहिते व्हा...’ हे ब्रीदवाक्य घेऊन, ‘मसाप’ च्या नगर शाखेने वाटचाल सुरु केली आहे. लहान मुलांमध्ये विचार करण्याची प्रक्रिया थंडावली असून, निरीक्षण करणे, पाहणे व अनुभवातून लिहिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांमधून दर्जात्मक साहित्याची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, संस्थांच्या माध्यमातून लेखनाची चळवळ रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. साहित्य परिषद ही सर्वसामान्यांची व्हावी यासाठी सुरुवात करण्यात येईल.

  जेष्ठ पदाधिकारी डॉ. सु. प्र. कुलकर्णी म्हणाले, इंग्रजी भाषेच्या अतिक्रमणामुळे मराठी भाषा संपण्याची शक्यता अनेक जण व्यक्त करतात. मात्र मराठी ही शाश्वत भाषा असल्याने मराठी कधीच संपणार नाही. दर्जेदार साहित्याच्या निर्मितीतून वाचकांच्या हृद्याला साहित्यिकांनी हात घातला पाहिजे. दररोज नवनवीन येणार्‍या लिखाणाची समीक्षा होण्याची गरज आहे. ‘वाचकांनो, लिहिते व्हा...’ या चळवळीतून महाराष्ट्र साहित्य परिषदेने नगरकरांना नेमके काय हवे आहे? हे ओळखले असल्याने नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.यावेळी मसापच्या अधिदेशक प्रा. डॉ. मेधाताई काळे, डॉ. खासेराव शितोळे, सल्लागार डॉ. क्रांतीकला अनुभले, महादेव कुलकर्णी उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य श्याम शिंदे, ल. धो. खराडे उपस्थित होते.

  यावेळी उपस्थित वाचकांनीही विविध प्रकारच्या सूचना मांडल्या. त्यात सुनील राऊत,  मुकुंद देवळालीकर, अॅड. शिवाजी कराळे, डॉ. प्रीती भोंबे, अॅड. सतीश भोपे, ल. धो. खराडे, अमृता धारणगावकर, सुधीर मेहता, विनायक पवळे, ज्ञानेश्वर कांबळे, अंजली वैद्य, ज्ञानदेव पांडुळे, संचिता आजबे, सदानंद भणगे, डॉ. अमोल बागुल, चंद्रकांत बेलसरे, बेबीताई गायकवाड, संजय कळमकर यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मसापच्या उपाध्यक्षा डॉ. शितल म्हस्के यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी केले. आभार प्रा. मेधाताई काळे यांनी मानले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad