Header Ads

 • Breaking News

  प्रतिबिंब महोत्सवात 'दिसाड दिस' अन् 'सावट' ठरले सर्वोत्कृष्ट लघुपट

  अहमदनगर । DNA Live24 - न्यू आर्टस कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयाेजित दहाव्या प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवाची नुकतीच उत्साहात सांगता झाली. पुण्याच्या नागनाथ खरात दिग्दर्शित "दिसाड दिस' या लघुपटाने विद्यार्थी गटातील सर्वोत्कृट पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर खुल्या गटातून कोल्हापरच्या 'सावट'ने बाजी मारली. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात जगभरातील गाजलेले सिनेमेही दाखवण्यात आले. यंदा या महोत्सवाला रसिकांनी विक्रमी गर्दी केली.

  न्यू आर्टसच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने १६ फेब्रुवारीला चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे, तसेच राष्ट्रीय पातळीवरील माहितीपट व लघुपट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे दहावे वर्ष होते. गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव न्यू आर्टस कॉलेजातील राजर्षी शाहू महाराज ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित केला जात आहे. यंदा या महोत्सवाला विक्रमी तीन हजार सिनेरसिकांनी गर्दी केली होती.

  बुधवारी सायंकाळी लावणी नृत्यांगणा संजीवनी काळे-नगरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या महोत्सवाचे औपचारिक उद्धाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, उपप्राचार्य एस. एस. जाधव, संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख बापू चंदनशिवे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या दिवशी रॉबर्ट झमेकिस दिग्दर्शित 'फॉरेस्ट गम्प' हा अमेरिकन सिनेमाने महोत्सवाला सुरूवात झाली. दुपारी लेनी अब्राहम्सन दिग्दर्शित 'रुम' व त्यानंतर पान नलीन दिग्दर्शित 'अँग्री इंडियन गॉडेसेस' हे सिनेमे दाखवण्यात आले.

  गुरूवारी अमेरिकेतील हॅरी हूक दिग्दर्शित 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज', पाकिस्तानी दिग्दर्शिका आफिया नाथनिन दिग्दर्शित 'दुख्तार', फिराेज अब्बास खान दिग्दर्शित 'देख तमाशा देख' हे सिनेमे दाखवण्यात आले. तर सायंकाळच्या सत्रामध्ये फ्रान्सचे यान अॉर्थस बेट्रांड दिग्दर्शित 'होम' हा माहितीपट दाखवण्यात आला. शुक्रवारी सकाळी प्रख्यात दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोविंद निहलानी दिग्दर्शित 'अर्धसत्य' हा सिनेमा दाखवण्यात आला. प्रेक्षकांनी चर्चेत सहभागी होत या सिनेमांचे रसग्रहण केले.

  शुक्रवारी दुपारी काही माहितीपट व लघुपट दाखवण्यात आले. तर शनिवारी सकाळी विद्यार्थी गटातील स्पर्धेत आठ व खुल्या गटात एकूण १८ लघुपट दाखवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पटकथालेखक आकाश ढोकेश्वर व अभिजीत देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांच्या व जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक संदीप गिऱ्हे, अनंत काळे, अभिजीत गजभिये, राहुल चौधरी, श्वेता बंगाळ-पेंढारे व विद्यार्थी प्रयत्नशील होते.

  विद्यार्थी विभागाचा निकाल - सर्वोत्कृष्ट लघुपट - दिसाड दिस (नाथनाथ खरात, पुणे), फस्ट रनरअप - सुनिल वंजारी (कोष, पुणे), सेकंड रनरअप - अक्षय देशपांडे (अंकुर, अहमदनगर), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुनिल वंजारी (कोष, पुणे), सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - योगेश जाधव (दिसाड दिस, पुणे), सर्वोत्कृष्ट एडिटर - योगेश जाधव (दिसाड दिस, पुणे).

  खुल्या विभागाचा निकाल - सर्वोत्कृष्ट लघुपट - सावट (स्वप्नील राजशेखर, काेल्हापूर), फस्ट रनरअप - बलुतं (अक्षय कुराणे, कोल्हापूर), सेकंड रनरअप - केविलवाणं (अजय येणारे, अहमदगनर), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिक - अजय कुराणे (बलुतं, कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - अभिषेक शेटे (सावट, कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट एडिटर - सलोनी कुलकर्णी (सावट, काेल्हापूर), स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड - खळी (विपुल महापुरूष, अहमदनगर), सर्वोत्कृष्ट माहितीपट - राजू, द सेव्हिअर (महेशकुमार सरतापे, पुणे).

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad