Header Ads

 • Breaking News

  शेवगावात झेडपीचे शांततेत मतदान

  शेवगाव । DNA Live24 - जिल्हा परिषद निवडणुकीत चार गटांसाठी तर पंचायत समितीच्या आठ गणांसाठी शेवगाव तालुक्यात एकूण ६५.७५ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सर्वाधिक लाडजळगाव  गटासाठी ७१ टक्के मतदान झाले. तर बोधेगाव जिल्हा परिषद गटात सर्वात कमी ६२ टक्के मतदान झाले. तालुक्यात सकाळी अनेक मोठ्या गावांतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी मतदानाचा वेग कमी होऊन चार वाजेनंतर पुन्हा रांगा दिसत होत्या. 

  अनेक गावांमधून कोणाला कसे मतदान चालले व कोणाची हवा गुल होणार याचीच चर्चा सुरू होती. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी घटल्यामुळे कोणाला फायदा होणार व कोणाला तोटा होणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मतदार मतदानासाठी रिक्षा व इतर वाहनांतून येत होते. दहिगावने येथील मोठी मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. या गटातील उमेदवार राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखऱ घुले, माजी आमदार नरेंद्र घुले यांनी तेथे मतदान केले. 

  तालुक्यातील गट व गणातील उमेदवार त्यांच्या भागात फिरून मतदानाची माहिती घेत होते. तर गावागावातील कार्यकर्ते गावातच मतदान करून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांमध्ये जास्तीचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे व त्यांच्या सहकार्‍यांनी संवेदनशील केंद्रे असलेल्या बोधेगाव, लाडजळगाव, दहिगावने येथे तसेच इतरत्र भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोवस्त ठेवला होता.

  कोठेही काही गैरप्रकार घडला नाही. मतदान प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे व तहसीलदार दीपक पाटील यांनी काही केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली. प्रशासनाने नियोजन चांगले केल्यामुळे शांततेत मतदान झाले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad