Header Ads

 • Breaking News

  पारधी समाज अंतरंगाचे संशोधन ग्रंथ स्वरूपात प्रकाशन

  श्रीगोंदे । DNA Live24 - पारधी समाजातील अंतरंग उलगडून दाखवणारे संशोधन प्रथमच ग्रंथरूपाने समाजापुढे आले आहे. श्रीगोंदे येथील प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांच्या या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते मंगळवारी येथे झाले. त्यानिमित्त झालेल्या पारधी मेळाव्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

  श्रीगोंदे येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील नागवडे कारखान्याचे संचालक अॅड. सुनील भोस होते. पारधी समाज, लोकजीवन आणि लोकसंस्कृती या नावाने हा ग्रंथ पद्मगंधा प्रकाशन (पुणे) यांनी प्रकाशित केला. डॉ. बळे यांनी कित्येक वर्षे संशोधन करून पारधी लोकजीवनाचे अंतरंग उलगडून जगापुढे आणले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना सर्वच वक्त्यांनी या संशोधनाबद्दल डॉ. बळे यांच्या चिकाटीचे धाडसाचे कौतुक करीत हा ग्रंथ पारधी जीवनात नवी पहाट घेऊन येईल, असा आशावाद व्यक्त केला. 

  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, समाज बदलत असला तरी ही प्रक्रिया खूप संथ आहे. येणारा काळ अधिक धोकादायक असेल. कारण चालीरिती पुनरुज्जीवनाची लाट येत आहे. समाज बदलू नये असाही काहींचा प्रयत्न असतो. त्यात त्यांचे हितसंबंध दडलेले असतात. बळेंचे पुस्तक हे समाज परिवर्तन घडवेल. भटक्यांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. पारधी समाज, भाषा, लोककथा, विधी याचा अभ्यास हवा, अन्य समाज घटकांनी ते जरूर वाचावे.

  पारध्यांमध्ये जाणीव निर्माण करण्यात या पुस्तकाचा उपयोग होईल. दुर्लक्षित असलेल्या एका आदिम जमातीबद्दल आतील पैलू जगापुढे येणे हे लोकसाहित्य बरोबरच समाज परिवर्तनासाठी क्रांतिकारी पाऊल आहे. मानवी हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ नेते समता अधिकार आंदोलनाचे संस्थापक अॅड. वाल्मिकराव निकाळजे यांनी चळवळीतील आपले अनुभव रसिकांसमोर कथन केले.

  यावेळी डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. मनोहर जाधव, प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे, डॉ. एस. पी. लवांडे, मुरलीधर होनराव, अॅड. सुनील भोस, प्रा. धर्मनाथ काकडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास प्रा. नारायण गवळी, सतीश पोखरणा, डॉ. स्मिता तरटे, अरुण जाखडे, मल्हारराव घोडके, प्राचार्य श्रीरंग लोखंडे आदी उपस्थित होते. प्रा. शंकरराव गवते प्रा. फुलसिंग मांडे यांनी सूत्रसंचालन केले. 

  Post Top Ad

  Post Bottom Ad