Header Ads

 • Breaking News

  ट्रकचालकाला लुटणारे आरोपी तीन तासांतच गजाआड

  अहमदनगर । DNA Live24 - भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रकचालकाना धाक दाखवून लुटणारे दोन आरोपी अवघ्या तीन तासांच्या आत गजाआड करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व पथकाने ही कामगिरी केली.

  युवराज नानासाहेब सपकाळ (२६, रा. गवळीवाडा, भिंगार) व शहाबाज रहेमान शेख (२३, रा. भातोडी पारगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी शनिवारी रात्री नगर सोलापूर रोडवर एका ट्रकचालकाला लुटले. प्रविण रमेश कसार (रा. जत, सांगली) असे ड्रायव्हरचे नाव आहे. कसार हा अहमदाबाहून औषधांनी भरलेला ट्रक घेऊन कोईमतूरला निघाला होता. त्याला सपकाळ व शेख यांनी शिटी वाजवून रस्त्यात अडवले. तुमच्या वाहनाचे कर्ज थकले असून आम्ही फायनान्सवाले अाहोत, असे सांगून त्यांनी कसारला खाली उतरायला भाग पाडले.

  नंतर त्यांना स्वत:च्या मोटारसायकलवर बसवून बळजबरीने चांदणी चौकात नेले. तेथे लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कसार यांच्या खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले व तेथून पसार झाले. थोड्या वेळाने पोलिसांचे वाहन तेथून गस्त घालत चालले होते. कसार यांनी वाहन थांबवून पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. एपीआय चव्हाण यांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपींच्या शोधात रवाना झाले. आरोपींना अटक करुन रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad