728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

पांगरमल दारुकांड : मंगल व महादेव आव्हाड यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल (ता. नगर) येथे अति मद्यसेवनामुळे बळी गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंगल महादेव आव्हाड व महादेव आव्हाड (दोघेही रा. पांगरमल, ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत. एलसीबीच्या पथकाने औरंगाबादेतून त्यांना ताब्यात घेतले. मंगल आव्हाड या जेऊर गणातून शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार होत्या. या दोघांनाही न्यायालयाने २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पांगरमल प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या मंगल आव्हाड या शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार होत्या. जेऊर गणातून त्यांनी निवडणूक लढवली अन् त्या निवडूनही आल्या. मात्र, तत्पूर्वीच्या त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली होती. त्यांना बुधवारी मध्यरात्री औरंगाबादेत ताब्यात घेण्यात आले. गुरूवारी दुपारी त्या अटकेत असताना पंचायत समिती निवडणुकीत त्या विजयी झाल्या. 

पांगरमल दारुकांडात नागरिकांचे बळी गेल्यानंतर १४ फेब्रुवारीला बबन आव्हाड (रा. पांगरमल) यांची फिर्याद एमआयडीसी पोलिसांनी नोंदवली. त्या  फिर्यादीवरुन पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, भाग्यश्री मोकाटे, मंगल महादेव आव्हाड, महादेव आव्हाड, शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड व रावसाहेब आव्हाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध व इतर कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासात एमआयडीसी पोलिसांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बनावट दारुनिर्मिती रॅकेटचा शोध लागला. या रॅकेटचे धागेदोरे धुळ्यापर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे आरोपींची संख्या वाढली. नंतर या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्याकडे सोपवण्यात आला. या गुन्ह्यात एकूण आरोपींची संख्या आता १६ झाली आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून उमेदवार मंगल आव्हाड, त्यांचे पती महादेव आव्हाड हे फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांनाही औरंगाबाद येथून ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या हवाली केले.

तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी दोघांनाही गुन्ह्यात अटक केली. गुरूवारी दुपारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या सखोल तपासाकरिता त्यांना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती त्यांनी व सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: पांगरमल दारुकांड : मंगल व महादेव आव्हाड यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी Rating: 5 Reviewed By: DNA Live24