Header Ads

 • Breaking News

  बनावट दारूच्या रॅकेटची एसआयटी मार्फत चौकशी करावी - विखे

  अहमदनगर । DNA Live24 - बनावट दारूमुळे निष्पाप लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बेकायदेशीर आणि बनावट दारू विक्रीला मदत करणार्‍या राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस अधिकारी यांनाही सहआरोपी करावे, घटनेची व्याप्ती लक्षात घेवून राज्यातील बनावट दारूच्या रॅकेटची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. 

  तालुक्यातील पांगरमल येथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भेट देऊन विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना दिलासा दिला. दहा दिवसात नऊ बळी गेल्यानंतरही सरकार मधील मंत्र्यांना येथेयेण्यास वेळ मिळू नये ही अत्यंत खेदजनक बाब असून सरकार संवेदनशील नसल्याचे यावरून स्पष्ट आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री निवडणुकीत अडकले होते, तर पालकमंत्र्यांना किंवा सरकारच्‍या वरिष्ठ अधिका-यांना पाठवायला हवे होते, असे ते म्हणाले.पण सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणा या घटनेतून समोर आल्याने  सरकारी  अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.


  या घटनेतील आरोपींबरोबरच अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी विखे यांनी केली. बनावट दारू विक्री होत असतानाहीस्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी  याकडे दुर्लक्ष कसे करू शकतात असा सवाल करून विखे म्हणाले की, सरकारी रुग्णालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडत होता तर मग वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले का? असा सवाल उपस्थित करून त्यांनी सांगितले की, कदाचित बनावट दारूमुळे यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही बळी गेले असतील तर याचीही चौकशी आता झाली पाहिजे.

  राज्यात यापूर्वी बनावट दारूमुळे शंभरहून अधिक बळी जाण्याची घटना घडली. त्यावेळीही मुख्यमंत्री तिथे भेट द्यायला गेले नव्हते. ज्या मुंबईतील रूग्णालयात रूग्णाना दाखल केले तिथे उपचारासाठी साधने उपलब्ध नव्हती त्यामुळे बळी गेले. येथे पैशाअभावी रूग्ण दगावत असतील तर शासकीय व्यवस्थेचे अपयश सिद्ध होत आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडूनमदत मिळावी यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. 

  बनावट दारु विक्रीचे मोठे रॅकेट केवळ नगर जिल्‍ह्यातच नव्‍हे तर राज्‍यात कार्यरत आहे. जिल्‍ह्यातील या घटनेची व्‍याप्‍ती लक्षात घेता स्‍वतंत्र चौकशी पथकामार्फत या सर्व घटनेतील धागेदोरे पुढे आणण्‍याची मागणी आपण मुख्‍यमंत्र्यांना भेटून करणार आहोत. दारु ज्‍या ठिाकाणाहून घेतली तेथील उत्‍पादनाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्‍याचे विखे यांनी यावेळी नमूद केले. 
  मृत व्‍यक्तिंच्‍या वारसांना जास्‍तीत जास्‍त शासकीय मदत देण्‍यात यावी, सरकारी वकील म्‍हणून उज्‍वल निकम यांची नियुक्‍ती करावी ही ग्रामस्‍थांची मागणी सरकारने मान्‍य करावी यासाठी आपण पुढाकार घेवू, संपुर्ण राज्‍यातच दारुबंदी करावी ही आपली मागणी कायम आहे. येत्‍या आधिवेशनात सरकारने अशा प्रकारचा प्रस्‍ताव आणल्‍यास त्‍यास आम्‍ही पाठींबा देवू असेही विखे यावेळी म्हणाले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad