Header Ads

 • Breaking News

  बेकायदा पेट्रोल विक्रीतून मांजरीत दोन गटात हाणामारी

  राहुरी । DNA Live24 - तालुक्यातील मांजरी येथे अवैध इंधनाच्या किरकोळ विक्रीवरून दोन व्यावसायिकांमध्ये हाणामार्‍या झाल्या. मात्र, काही स्थानिकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविल्याचे समजते. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अवैध व्यवसायातून हाणामारी झाल्याने पोलिस ठाण्यात जाण्याचे दोन्ही गटांनी टाळले आहे.

  गेल्या आठ ते दहा दिवसापासून मांजरी परिसरातील पेट्रोल पंप बंद असल्याने हातविक्री करणार्‍या व्यायसायिकांनी पेट्रोलची चढ्याभावाने विक्री रस्त्यावर सुरू केली आहे.  पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी आपल्याकडेच  पेट्रोल घ्यावे, यासाठी दोन व्यावसायिकांमध्ये हमरीतुमरी झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. अवैध पेट्रोल विक्री करणार्‍या या दोघांमध्ये जोरदार सुरू झालेली हाणामारी पाहुन तेथे उपस्थित स्थानिकांनी मध्यस्थी करून प्रकरण जागेवरच मिटवले.

  या पेट्रोलमध्ये भेसळ असून त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. पेट्रोल विक्री करणारे ग्राहकांना दादागिरी करीत असल्याने त्यांना मनःस्ताप होत आहे. हे इंधन विक्री करणारे रस्त्यातच उभे राहून पेट्रोल विक्री करीत आहेत.
  ज्वलनशील पदार्थांची उघड्यावर विक्री होत असून त्याकडे संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. या व्यावसायिकांमध्ये दररोजच हाणामार्‍या होत असल्याने गावात दहशत पसरली आहे. हे वाद मध्यस्थी करून सोडविले जात असल्याने पोलिसांनीही या प्रकरणाबाबत सोयीस्कर मौन बाळगले आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad