728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जवखेडे खटल्यात सहायक तपासी अधिकाऱ्यांची साक्ष सुरू

अहमदनगर । DNA Live24 - बहुचर्चित जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड खटल्याच्या सुनावणीत मंगळवारी सहायक तपासी अधिकारी असलेल्या एपीआय शरद गोर्डे यांची सरतपासणी सुरू झाली. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेला त्यांची साक्ष नोंदवण्याचे काम सुरू झाले. एपीआय गोर्डे यांची साक्ष नोंदवण्यास आक्षेप घेत आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दिला होता. मात्र, जिल्हा न्यायालयाने तो फेटाळून लावला.

प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर जवखेडे तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याचे कामकाज सुरू आहे. मंगळवारी सकाळी खटल्याचे कामकाज सुरू झाले त्यावेळी पंचांच्या साक्षीअगोदर सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांची साक्ष नोंदवण्यास आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. गोर्डे यांची साक्ष अगोदर घेतल्यास आरोपींच्या हक्काला बाधा पोचेल, असा अर्ज त्यांनी न्यायालयात दिला होता. त्यावर  विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला.

न्यायालयाच्या आदेशानुसार जवखेडे तिहेरी हत्याकांडाच्या खटल्यातील साक्षीदारांची यादी नोव्हेंबर २०१६ मध्येच न्यायालयात सादर केलेली आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अॅड. उमेशचंद यादव यांचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा अर्ज फेटाळून लावला. मंगळवारच्या सरतपासणीमध्ये गोर्डे यांनी मयत जयश्री जाधव व सुनिल जाधव यांचा इन्क्वेस्ट पंचनामा केल्याचे सांगितले. जयश्री जाधव यांचे कपड्यांचे व दागिन्यांचे त्यांनी अचूक वर्णन केले. तसेच या वस्तू त्यांनी न्यायालयात बरोबर ओळखल्या.

याशिवाय एपीआय शरद गोर्डे यांनी मयत सुनिल जाधव याच्या खांद्यापासून तोडलेल्या हातांचाही पंचनामा केला असल्याचे न्यायालयात सांगितले. मयत सुनिल याच्या डाव्या हातावर असलेल्या जखमांचेही त्यांनी अचूक वर्णन केले. घटनेच्या वेळी सुरुवातीला एका व्यक्तीवर संशयाची सुई दाखवण्यात आलेली होती. त्या व्यक्तीच्या घराची झडती घेतल्याचेही एपीआय गोर्डे यांनी सरतपासणीत नमूद केले. गोर्ड यांची सरतपासणी सुमारे पाच तास चालली. बुधवारीही त्यांची सरतपासणी सुरू राहणार आहे. तर या खटल्याचे कामकाज बुधवारपर्यंत चालणार आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जवखेडे खटल्यात सहायक तपासी अधिकाऱ्यांची साक्ष सुरू Rating: 5 Reviewed By: DNA Live24