Header Ads

 • Breaking News

  कोपर्डी खटला - आजीने त्यांना शेतात जाताना पाहिले होते

  अहमदनगर । DNA Live24 - कर्जत तालुक्यातील कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत मंगळवारी पीडितेच्या चुलत आजीची साक्ष पूर्ण झाली. घटनेच्या दिवशी मुख्य आरोपीचे साथीदार संतोष भवाळ नितीन भैलुमे यांना पाहिले होते, त्यांना हटकलेही होते. आम्ही गावात गेलो होतो, असे सांगून ते सटकले नंतर बाभळीच्या झाडाखाली उभे राहिले, असे चुलत आजीने सांगितले. न्यायालयात हजर असलेल्या आरोपींनाही त्यांनी ओळखले. त्यांची उलटतपासणीही पूर्ण झाली आहे.

  आजींनी सांगितले की, शेळी घरी आणल्यानंतर काही वेळाने शेजारच्या शेतातून ओरडण्याचा आवाज आला. धावत जाऊन पाहिले, तर तेथे पीडितेचा मृतदेह तिच्या आईच्या मांडीवर होता. पीडितेची आई रडत होती. तिला चक्कर आल्याने घरी नेले पीडितेला उपचारांसाठी दवाखान्यात नेले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उलटतपासणीत आरोपीच्या वकिलांनी केलेल्या आक्षेप आरोपांचाही त्यांनी इन्कार केला.

  सोमवारी अपूर्ण राहिलेली छायाचित्रकाराची उलट तपासणी आधी पूर्ण झाली. आरोपीच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्याने आपण सरकारी फोटोग्राफर नसल्याचे, तसे शिक्षणही घेतले नसल्याचे कबूल केले. घटनास्थळाची छायाचित्रे घेतल्याबद्दलच्या कामाचे एक हजार रुपये मिळाल्यानंतर तशी पावती दिली नसल्याचे सांगितले. सोमवारी आरोपींच्या वतीने करण्यात आलेल्या तीन अर्जांवर न्यायालयात सुनावणी झाली.

  सरकार पक्षाचे सर्व पुरावे अगोदरच न्यायालयाच्या नोंदवहीत घ्यावेत, अशा मागणीचा अर्ज आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळला. सरकार पक्षाने सोमवारी सादर केलेली छायाचित्रे चित्रफिती पुराव्याच्या यादीत नसल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सर्व पुरावे न्यायालयात रजिस्टरवर आणून त्याच्या सत्यप्रती मिळाव्यात, अशी मागणीही केली होती.

  छायाचित्र चित्रफिती असलेला लिफाफा न्यायालयात सादर असल्याचे नोंदवहीत नमूद आहे, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच आरोपींच्या वकिलांचा अर्ज म्हणजे न्यायालयीन कामकाजावर अविश्वास दाखवणे होईल, असे म्हणत आरोपींच्या वकिलांचा अर्ज फेटाळला. याशिवाय तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याला शैक्षणिक अभ्यासासाठी हव्या असलेल्या पुस्तकांच्या मागणीचा अर्ज सध्या तात्पुरता प्रलंबित ठेवण्यात आला आहे.या खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने न्यायालयात उपस्थित असतात.

  Post Top Ad

  Post Bottom Ad