Header Ads

 • Breaking News

  लाचार अधिकार्‍यांना तालुक्यात ठेऊ नका - मधुकर पिचड

  अकोले । DNA Live24 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी पिचड यांनी पोलिस अधिकारी व तहसीलदारांवर घणाघाती टीका करीत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. निलंबन न झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही पिचड यांनी दिला.

  राष्ट्रवादी काँग्रेसने आचारसंहिताभंगा बाबत सात तक्रारी केल्या होत्या. पण, या तक्रारींची दखल घेेतली नाही, असा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल उपोषण केले. यावेळी  पिचड यांनी येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक हे सेना-भाजप युतीचे दलाल असल्याचा आरोप केला. याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अकोले तालुक्यात विकृतीचे राजकारण कधीच केले नाही, नेहमीच संस्कृतीचे राजकारण केले. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पोलिसांनी थेट पोलिंग बुथवर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

  जनतेवर अन्याय करणार्‍या मामलेदाराला तालुक्यातील जनतेने जिवंत जाळल्याच्या इतिहासाची त्यांनी सांगितला. अवैध धंदे बंद झाले नाहीत तर अधिकार्‍यांना तेथे नेऊन धंदे बंद करू, असे ते म्हणाले. लाचार अधिकार्‍यांना तालुक्यात ठेऊ नका, चांगले अधिकारी पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी यशवंत आभाळे, नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, अशोक देशमुख, विक्रम नवले, विकास शेटे यांची भाषणे झाली. सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, तालुका सचिव यशवंत आभाळे, संतोष देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

  यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, महिलाध्यक्षा चंद्रकला धुमाळ, युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, सभापती अंजना बोंबले, जनलक्ष्मीचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, राजेंद्र डावरे, गोरक्ष मालुंजकर, अरुण शेळके, रमेश जगताप, शरद चौधरी, रामनाथ वाकचौरे, सुभाष बेणके, पुंजा आवारी, बाळासाहेब भोर, बाळा नवले, आनंद वाकचौरे, राहुल बेणके, राहुल देशमुख, आर. के. उगले, बबन देशमुख, बाळासाहेब वैद्य, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, सचिन शेटे,  बाळासाहेब वडजे , सर्व नगरसेवक,  जिल्हा परिषद – पंचायत समितीचे उमेदवार यावेळी उपस्थित होते.

  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सायंकाळी झालेल्या बैठकीला प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अजय देवरे, तहसीलदार मनोज देशमुख, पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad