Header Ads

 • Breaking News

  नोएडा फिल्म फेस्टिव्हलमध्ये रायरंदचे कौतुक

  अहमदनगर । DNA Live24 - नवखे दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे लेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या रायरंद चित्रपटाला नुकत्याच नोएडा येथे झालेल्या चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक्सलन्स पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचा एक खेळ फेस्टिव्हलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपटाला रसिकांची चांगलीच दाद मिळाली.  न्यू टॅलेंट सर्च मुव्हीजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पुणतांबे (ता. राहाता) येथे झाले.

  नगर जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. या चित्रपटात बहुरूपी बालमजुरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लहान मुलांच्या हातात पाटी आणि पेन्सिल असायला हवी, पण त्यांना मजबुरीमुळे काम करावे लागते. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूप्याची गोष्ट मांडलेली आहे. श्रीरामपूरचे कलावंत श्यामकुमार श्रीवास्तव यांनी रायरंदची भूमिका साकारली आहे. अभिनेता आनंद वाघ यांनी या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. निनगुरकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. तर गीतलेखन भावेश लोंढे निनगुरकर यांचे आहे.

  रायरंद या चित्रपटात अनंत जोग, रणजित कांबळे, श्यामकुमार श्रीवास्तव, आशिष निनगुरकर, करण कदम, आनंद वाघ, अजित पवार, प्रवीण भाबळ, सुनील जैन, सुरेश दाभाडे, रेखा निर्मळ, गोरख पठारे, झाकीर खान, राजू ईश्वरकट्टी, नाना शिंदे, संतोष चोरडिया, स्वप्नील निंबाळकर, फिरोज खान, सुभाष कदम अनुराग निनगुरकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश पोपट ननावरे असून कॅमेरामन राजेश वाव्हळ, कलादिग्दर्शक सुभाष कदम, संगीतकार विकास जोशी, कार्यकारी निर्माते भावेश लोंढे सहकारी अमेय शेणवी प्रतिश सोनवणे असून संकलक पोस्ट प्रॉडक्शन हेड अजित देवळे आहेत.

  भरकटत चाललेल्या समाजाला जागे करायचे असेल, तर सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय परिणामकारकरित्या लोकांपर्यंत पोहोचवता येतो. बालमजुरीसारखा गंभीर विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असे दिग्दर्शक ननावरे यांनी सांगितले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad