Header Ads

 • Breaking News

  मिथेनॉलच निघाले पांगरमल दुर्घटनेतील मृत्यूकांडाचे कारण

  अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल (ता. नगर) येथील अति मद्यसेवनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे व्हिसेरा अहवाल पाेलिसांना दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाले अाहेत. बनावट दारुमध्ये मिसळलेल्या मिथेनॉलमुळेच या दारूकांडातील नागरिकांचे मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटलेले आहे. मात्र हे मिथेनॉल कोठून आणले, याबाबत आरोपी माहिती देत नाहीत. त्यामुळे अधिक तपासाकरिता तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत २७ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. धुळ्यातून अटक केलेल्या कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी यालाही २७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

  १४ फेब्रुवारीला अति मद्यसेवनामुळे पांगरमल (ता. नगर) परिसरातील चौघा जणांचे मृत्यू झाले. त्यानंतर लागोपाठ आणखी काही जणांचे बळी गेले. पांगरमल परिसरातील सुमारे नऊ लोकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय बनावट दारु प्यायल्यामुळे नगर तालुक्यातील दोन व पारनेर तालुक्यातील दैठणे येथील दोघांना प्राणास मुकावे लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तेरा बळी गेले आहेत. पांगरमल दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आतापर्यंत १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे.

  बनावट मद्यनिर्मितीच्या रॅकेटमध्ये आतापर्यंत १२ जणांना अटक झालेली आहे. सध्या चौघे पोलिस कोठडीत असून ८ जण न्यायालयीन कोठडीत रवाना झाले आहेत. बनावट मद्यनिर्मितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जितू गंभीर, जाकीर शेख, हमीद शेख, मोहन दुगल, संदीप दुगल, भरत जोशी, याकूब शेख, नन्हे शेवानी, आदींची नावे समोर आली आहेत. गंभीर, शेख, दुगल, जोशी हे मद्यनिर्मिती करायचे. इतर आरोपी त्यांना कच्चा माल पुरवत होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

  धुळ्याचा दादा वाणी या रॅकेटमध्ये अल्कोहोलचा पुरवठा करत असल्याचे समोर आले. त्यालाही या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केले आहे. मात्र, याकूब शेख व नन्हे शेवानी हे फरार आहेत. दादा वाणीनेही नगरच्या आरोपींनी अल्कोहोल पुरवल्याचे सांगितले आहे. मात्र त्याने अल्कोहोल कोणाकडून आणले, याकूब शेखचा शोध घ्यायचा आहे, त्याच्या घराची झडतीची गरज आहे, आरोपींनी मिथेनॉल कोणाकडून घेतले होते, दारुसाठी मिथेनॉलचा नेमका कोणी वापर केला, याबाबत सखोल तपासाकरिता आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी केली. ती मान्य करीत न्यायालयाने आरोपींना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
  निलंबनाची कुऱ्हाड - पांगरमल दारूकांडात बनावट मद्यनिर्मिती करण्यास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच जण निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये तीन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक एस. पी. शिंदे, दुय्यम निरीक्षक बी. आर. पगारे व बी. टी. व्यवहारे यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे
  नगरमध्येच दारुनिर्मिती - आरोपी भरत जोशी याने दादा वाणीकडून अल्कोहोल खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दादा वाणीला ताब्यात घेतले. त्यानेही पोलिसांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. वाणीकडून अल्कोहोल आणल्यानंतर सर्वांनी मिळून फरार आरोपी याकूब शेखच्या घरी दारु बनवली होती. मात्र, याकूब फरार असून त्याच्या घरालाही कुलूप आहे. त्यामुळे पोलिसांना तपासात मर्यादा येत आहेत. याकूबचा शोध लागल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.
  दारुनिर्मितीचे प्रात्यक्षिक  - मिथेनॉल, स्पिरिट, अल्कोहोल, दारुनिर्मितीसाठी लागणारे कच्चे रसायन, यांच्या साह्याने बनावट दारु कशी तयार करायची, याचे प्रात्यक्षिकच आरोपींना पोलिसांसमोर करुन दाखवले.  पोलिसांनी आरोपींकडून कबुली देताना हे प्रात्यक्षिक करवून घेतले. तसा पंचनामासुद्धा केलेला आहे. पोलिसांसमोरच आरोपींनी काही मिनिटांतच बनावट दारु तयार करुन दाखवली.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad