728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

बनावट दारु प्रकरण : आराेपींचा पाोलिस कोठडीतील मुक्काम वाढला

अहमदनगर । DNA Live24 - नगर तालुक्यातील पांगरमल येथे बनावट मद्य सेवन केल्यामुळे बळी गेल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत २२ फेब्रुवारीपर्यंत वाढ झाली. जाकीर शेख, जितू गंभीर व हमीद शेख यांची पोलिस कोठडी वाढली आहे. तर सुरुवातीला अटक केलेल्या शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड व रावसाहेब आव्हाड यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी हे आदेश दिले आहेत.

या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. भीमराज आव्हाडला पहिल्याच दिवशी अटक केली होती. त्याने कबुली दिल्यानंतर जितू गंभीर, जाकीर शेख यांना अटक झाली. नंतर मोहन दुगल, संदीप दुगल, वैभव जाधव, भरत जोशी यांना अटक झाली. मोहन दुगल, संदीप दुगल, वैभव जाधव, भरत जोशी यांना २२ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. रुग्णालयातून डिसचार्ज मिळताच रावसाहेब आव्हाडला अटक झाली.

भीमराज आव्हाड, जितू गंभीर, जाकीर शेख व हमीद शेख यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे त्यांच्यासह रावसाहेब आव्हाड याला पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. गुन्ह्याच्या सखोल तपासाकरिता आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी आनंद भोईटे व सरकारी वकिलांनी केली. पण, आरोपींच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने दोघांचीच कोठडी वाढवली.

सोमवारी सकाळी पांगरमलच्या ग्रामस्थांनी नगर औरंगाबाद महामार्गावर पांढरी पूल येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. पांगरमलचे सरपंच बापूसाहेब आव्हाड, उपसरपंच देविदास आव्हाड, बाजार समितीचे संचालक बबन आव्हाड, अमोल आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे व पोलिसांचा बंदोबस्त यावेळी तैनात होता.

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. ग्रामस्थांनी बनावट दारुमुळे बळी गेलेल्या कुटुंबियांना शासकीय मदत द्यावी, या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करावी, या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रकरणात अडकलेल्या राजकीय आरोपींवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तसे निवेदनही दिले.

उपअधीक्षक आनंद भोईटे म्हणाले, उर्वरित आरोपींना लवकर अटक करु, आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल प्राप्त होताच आरोपींना मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम केले जाईल. वैद्यकीय उपचार घेत असलेल्या आरोपीला डिसचार्ज मिळताच त्याला अटक केली आहे. इतर फिर्यादींच्या तक्रारीही नोंदवून घेतल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना वर्ग केले जाईल.

पांगरमल दुर्घटना घडून आज आठ दिवस उलटले. पण, पालकमंत्री गावात अालेले नाही. त्यांनी चौकशीही केली नाही. ते सांत्वन करण्यासाठी आले नाही. गावावर पसरलेल्या शोककळेमुळे आम्हाला रस्त्यावर यावे लागले. या गुन्ह्याचा तपास सीबीआयमार्फत करुन या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

आणखी एक दवाखान्यात - पालेवाडी (ता.पाथर्डी) येथे अतिमद्य सेवनाने बेशुद्ध झालेल्या एका व्यक्तीला सोमवारी सिटी केअर दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉ. संदीप सुराणा यांनी त्याची तपासणी केली. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार चालू आहेत. पांगरमल येथील रुग्णांप्रमाणेच त्याची अवस्थाही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. करोली गावात लग्न समारंभात अति मद्यसेवन केल्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यामुळे काही लोकांनी त्याला नगरला रुग्णालयात दाखल केले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: बनावट दारु प्रकरण : आराेपींचा पाोलिस कोठडीतील मुक्काम वाढला Rating: 5 Reviewed By: DNA Live24