Header Ads

 • Breaking News

  पालकांनी मुलांना समजून घ्यायला हवे - शिवाजी नाईकवाडी

  अहमदनगर । DNA Live24 - मुले शाळेत जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची, संस्कारांची व वर्तवणुकीची जबाबदारी शाळेची व शिक्षकांचीच हा समज पालकांनी करून घेऊ नये. कारण शाळेपेक्षा मुले घरात जास्त काळ असतात व घरतील वातावरणावरच मुलांचा विकास होत असतो. तसेच संस्कारक्षम वातावरण घरातूनच निर्माण होते. यासाठी मुलांना समजून घेण्याची पालकांची भूमिका हवी असे मत व्याख्याते शिवाजी नाईकवाडी  यांनी व्यक्त केले.

  श्रीरामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूल, मानधना कॉलेज, मातापालक संघ व प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या सहकार्याने पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत ‘संस्कारांची जपवणूक’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा माधुरी सारडा, सचिव डॉ. प्राची पाटील, माजी अध्यक्षा प्रतिभा धूत, गोविंद आडम, प्राचार्या गीता गिल्डा उपस्थित होते.

  यावेळी नाईकवाडे म्हणाले, सध्याची मुले ऐकतच नाही ही प्रत्येक पालकांची तक्रार असते. खरे तर आपण मुलांचे किती ऐकतो याचा विचार करा. त्यांच्या प्रश्नांना वेळीच उत्तरे द्या. त्यांच्यात होणारे बदल, त्यांचा मित्रपरिवार, सवयी याकडे लक्ष ठेवा. कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याची शिकवण द्या. स्वतः निर्भय व्हा व त्यांना निर्भय होण्यासाठी त्यांना पाठबळ द्या.

  मुलांचे मित्र बनून त्यांना माणसे ओळखण्यासाठी मार्गदर्शन करा, स्वतः सतत शिकण्याची भूमिका ठेवा, कारण किती जगला त्यापेक्षा कसे जगला याला फार महत्व आहे. प्रास्ताविक प्राचार्या गीता गिल्डा यांनी केले. त्या म्हणाल्या, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा समन्वय असेल तर विद्यार्थ्यांना घडविणे सोपे जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजना पंडित यांनी केले. तर आभार रोटरीच्या सचिव डॉ. प्राची पाटील यांनी मानले. कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad