728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

तिरमली समाजाच्या जातपंचांविरुद्ध पुन्हा खंडणीचा गुन्हा

शिर्डी । DNA Live24 - जिल्ह्यात तिरमली समाजाची जातपंचायत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दोन मुलींना सासरी नांदवत नसल्याने जातपंचायतीत वाद मिटविण्यासाठी दोन लाखांची मागणी केल्याच्या फिर्यादीवरुन न्यायालयाच्या आदेशाने शिर्डी पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़. यातील आरोपींवर यापूर्वीही जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपींमध्ये बाळासाहेब गंगाधर शिंदे, अहिल्याबाई गंगाधर शिंदे, काशिनाथ गंगाधर शिंदे, रामा गंगाधर शिंदे, हनुमंत गंगाधर शिंदे (सर्व चांदा, ता. नेवासे), रामा साहेबराव फुलमाळी (ओझर गणपती, नारायणगाव), सुभाष हनुमंता फुलमाळी (शिंगणापूर, ता. नेवासे), गंगाधर तुकाराम फुलमाळी (भेंडा, ता. नेवासे), गंगा गंगाधर गुंडाळे (दैठण, ता. श्रीगोंदे), तात्याबा शिवराम फुलमाळी (ढोरजळगाव, गंगापूर, औरंगाबाद), उत्तम फुलमाळी (जेऊर, ता. नेवासे) आदींचा समावेश आहे.

याबाबत शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे म्हणाले, सावळीविहीर गावातील तिरमली समाजातील एका व्यक्तीने आपल्या दोन मुलींचे लग्न नेवासा तालुक्यातील चांदा गावातील एकाच कुटुंबातील दोन भावांशी करून दिले होते. मात्र घरात किरकोळ वाद झाल्याने या दोन्ही सख्या बहिणींना सासरच्या लोकांनी घरा बाहेर हाकलून दिले.  या दोन्ही बहिणी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या माहेरी राहत आहेत़

या मुलींना सासरचे लोक नांदवत नसल्याने त्यांच्या वडिलांनी आपल्या घरी समाजाची जात पंचायत भरविली होती़. यावेळी पंचांनी हे वाद मिटविण्यासाठी या मुलींच्या वडिलांकडे दोन लाखांची मागणी केली़. यावर मुलीच्या वडिलांनी आपल्याकडून दोन लाखांची खंडणी मागण्यात येत असल्याची व जाती बाहेर काढण्याची धमकी देण्यात येत असल्याची खासगी फिर्याद राहाता न्यायालयात दाखल केली होती़.

राहाता न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी जात पंचायत व सासर कडील अकरा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे़. यापूर्वीही शिर्डी पोलिस ठाण्यात याच आरोपींवर एका गुन्ह्याची नोंद आहे. शिवाय श्रीगोंदा, संगमनेर पोलिस ठाण्यातही या आरोपींवर अशाच स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे तिरमली समाजाची जातपंचायत वादात सापडली आहे. गुन्हा नोंदवलेला असला, तरी शिर्डी पोलिसांनी या आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: तिरमली समाजाच्या जातपंचांविरुद्ध पुन्हा खंडणीचा गुन्हा Rating: 5 Reviewed By: DNA Live24