Header Ads

 • Breaking News

  न्यू आर्टसमध्ये बुधवारपासून राष्ट्रीय 'प्रतिबिंब चित्रपट महोत्सव'

  अहमदनगर । DNA Live24 - न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातर्फे आयोजित दहावा राष्ट्रीय प्रतिबिंब चित्रपट महोत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. जगभरातील नामांकित व उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट या महोत्सवात पहायला मिळणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या यंदाच्या महोत्सवाची थीम जीवनशैलीवर आधारित असणार आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता महोत्सवाला सुरुवात होईल.

  चित्रपटामध्ये यंदाच्या वर्षी युएसएमधील ‘फोरेस्ट गम्प’ या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. हा सिनेमा अमेरिकन जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करणारा आहे. या चित्रपटाचे रॉबर्ट जेमिकिस यांनी दिग्दर्शन केले आहे. दुपारच्या सत्रामध्ये कॅनडाचा 'रुम' हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लेनी अब्राहम यांनीकेले आहे. रूम चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये, संकटावर मात करणाऱ्या आई व मुलाचे चित्रण यामध्ये केले आहे.

  बुधवारी दुपारच्या सत्रामध्ये भारतातील 'द अंग्री इंडियन गोड्नेस' हा चित्रपट दाखवण्यात येईल. चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केले असून, या चित्रपटात २१ व्या शतकातील भारतीय स्त्रियांच्या सामाजिक जीवनाचे वास्तव मांडलेले आहे. तसेच प्रत्येक चित्रपटानंतर उपस्थित प्रेक्षकांशी चर्चा देखील केली जाणार आहे. गुरुवारी युएसएचा 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' या चित्रपटात मानवी जीवनातील निरागसृपणाचा अंत होऊन हिंसेची सुरवात यामधील संघर्ष मांडलेला आहे.

  गुरुवारी दुपारी भारतीय चित्रपट ‘देख तमाशा देख’, पाकिस्तानचा ‘दुख्तार’ व फ्रान्सचा ‘होम’ चित्रपट दाखवला जाईल. ‘होम’ सिनेमातून माणसाच्या यांत्रिकीकरणाचा निसर्गावर व निसर्गाचा मानवावर होणारा परिणाम असा निसर्गाचे कालचक्र दिसेल. तिसऱ्या दिवशी गोविंद निहलानी यांचा 'अर्धसत्य' सिनेमा दाखवला जाईल. भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रियता मिळवलेले दिवंगत कलाकार ओम पुरी व सदाशिव अमरापुरकर यांना श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट दाखवला जाईल.

  शुक्रवारपासून महोत्सवातील लघुपट व माहितीपट दाखवले जातील. यामध्ये देशभरातील ‘लघुपट’ व ‘माहितीपट’ दाखवले जातील. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धा सुरु राहिल. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुख बापू चंदनशिवे, संदीप गिऱ्हे, अनंत काळे, अभिजीत गजभिये, राहुल चौधरी, श्वेता बंगाळ या प्राध्यापक वृंदासह विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.

  जीवनशैलीवर आधारित दुर्मिळ सिनेमे 
  संज्ञापन अभ्यास विभागच्या वतीने अायोजित प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचे यंदा दहावे वर्ष आहे. दरवर्षी एका विशिष्ट थीमवर आधारित असलेले जगभरातील दुर्मिळ सिनेमे या महोत्सवात दाखवले जातात. स्त्री-भ्रूणहत्या, जाती-धर्माचे राजकारण, सिनेमाध्यमाची ताकद, अशा आशयाच्या यापूर्वीच्या थीम प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करुन आहेत. यंदा या महोत्सवाची थीम"जीवनशैली' अशी आहे. यंदाही दुर्मिळ सिनेमे रसिकांना पहायला मिळणार आहेत. - बापू चंदनशिवे, विभागप्रमुख, संज्ञापन अभ्यास विभाग

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad