728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सिव्हिलच्या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोदवा - 'मावळा'ची मागणी

अहमदनगर । DNA Live24 - सर्पदंश झालेल्या मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन न घेता, रुग्णाच्या मृत्यूस कारणीभुत ठरणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मावळा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सिव्हिल सर्जन डॉ. एस. एम. सोनवणे यांना देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष निलेश म्हसे, महेश शेळके, दानिश शेख, अक्षय उमाप, अमोल मोरे, आदिनाथ भांगरे, भारतरत्न कोंडार, अंकुश भोरे, गणेश टोने, नितीन साबळे, नवनाथ भांगरे, शंकर लांघी, हेमंत घोडके आदि उपस्थित होते. सिव्हिल सर्जन सोनवणे यांनी अतिदक्षता विभागाची वेगळी व्यवस्था करुन बेड संख्या वाढविण्याचे व या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.

हरिश्‍चंद्र गड (ता. अकोले) येथील तुकाराम मधे सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे शेतमजुरी करत आहेत. त्यांच्या तीन मुलांना मंगळवारी रात्री साप चावला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार न करता खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला. तसेच प्राथमिक उपचार करण्यास देखील असमर्थता दाखविली.

या दिरंगाईमुळे ९ वर्षाची उज्वला मधे हिला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने पुन्हा जिल्हा शासकिय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पहावयास मिळाला आहे. तसेच सर्पदंश झालेले प्रमिला मधे (वय 11 वर्षे), राजेंद्र मधे (वय 7 वर्षे) यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला.

जिल्हा रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. अतिदक्षता विभागाची खाट संख्या वाढवून, ते अद्ययावत करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सिव्हिलच्या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोदवा - 'मावळा'ची मागणी Rating: 5 Reviewed By: DNA Live24