Header Ads

 • Breaking News

  सरकार पुरस्कृत भांडवलशाहीचे आक्रमण लोकचळवळीतून रोखावे - शाहीर संभाजी भगत

  अहमदनगर । DNA Live24 - समाजातील जातीय व्यवस्थेचे व्यंग, भांडवलशाहीमुळे आलेली सुज, ब्राम्हणवादी व्यवस्थेने सर्वच क्षेत्रात चालविलेला धुमाकूळ, त्यातून निर्माण झालेली बौध्दिक गुलामगिरी,परिणामी होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांसह सांस्कृतिक दहशतवादावर विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी पोवाड्याच्या माध्यमातून आसुड ओढले. तसेच मार्मिक टिप्पणी करत प्रबोधन केले. शिवप्रहार संघटनेतर्फे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी शिवजलसा कार्यक्रमाद्वारे संवाद साधला.

  भिस्तबाग चौकात कार्यक्रमासाठी आलेल्या शिवप्रेमींच्या गर्दीने उच्चांक गाठला. यामध्ये महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी शाहीर संभाजी भगत यांचा वैचारिक पुस्तक देवून सत्कार केला. यावेळी अविनाश गुंजाळ, दिपक शिंदे, राजेंद्र कर्डिले, वैभव कदम, संदिप संसारे, प्रविण गवळी, बाबाजी शिंदे, यशवंत तोडमल, नीतीन ढाळे, शिवा शिंदे, प्रशांत लवांडे आदि उपस्थित होते.

  प्रारंभी शहिद भगतसिंग यांच्या गीताने शाहिरी जलस्याला सुरुवात झाली. शाहीर भगत यांनी ब्राम्हणवाद व भांडवलशाहीवर हल्ला चढवला. यानंतर त्यांनी भाषाशास्त्र, समाजशास्त्र व सौंदर्यशास्त्रावर भाष्य केले. ग्लोबल गोंधळ या पोवाड्याने त्यांनी जागतिकीकरणावर हल्ला चढवला. शाहीर भगत म्हणाले, इतिहासाचे झालेले विकृतीकरण नवीन संशोधनाच्या माध्यमातून दुरुस्त होत असेल, तर त्याला विरोध न करता सकारात्मक मानसिकतेने बघितले पाहिजे.

  सरकार पुरस्कृत भांडवलशाही सध्या देश गिळंकृत करीत आहे. वर्ण लढा आवश्यक आहेच, पण त्यापेक्षा वर्ग लढा मोठ्या ताकतीने लढावा लागणार आहे. भांडवलदार व सरकार हातात हात घालून शेतकऱ्यांना उधवस्त करीत आहे. सरकार पुरस्कृत भांडवलशाहीचे आक्रमण लोकचळवळीतून रोखावे लागेल. वेगवेगळे दाखले देत भगत यांच्या शाहिरी जलशाने उपस्थितांना अडीच तास खिळवून ठेवले. दोनच राजे इथे गाजले... या पोवाड्याने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले.

  उपस्थित श्रोते या शाहिरी जलस्याने मंत्रमुग्ध झाले. संजीव भोर म्हणाले की, अन्याय अत्याचारा विरोधात संघर्ष करण्यासाठी शिवप्रहार संघटना कटीबध्द आहे. समाजातून मिळत असलेल्या पाठबळाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करुन उत्सवाची सांगता करण्यात आली.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad