Header Ads

 • Breaking News

  न्यू आर्टस कॉलेजात विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात

  अहमदनगर । DNA Live24 - प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्यामधील बलस्थाने शोधावी. काही उणीवा असल्यास त्या दूर करण्यासाठी सदैव तत्पर रहावे. धैर्य दाखवणार्‍यांना संधी मिळते. योग्य संधी ओळखून, ती संधी आपल्याकडे खेचून त्या संधीचे सोने करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांनी केले.

  न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय इंग्रजी विभागाच्या पालक, विद्यार्थी, शिक्षक मेळाव्यात कार्ले बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य आर. जी. कोल्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी गजानन घोरपडे, प्रा. बी. डी. घोडके, प्रेमकुमार पालवे, बापूराव वाळुंज, शुभांगी शिंदे आदिंसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कार्ले म्हणाल्या, पालक, शिक्षक व विद्यार्थी तिन्ही घटक एकमेकास पुरक असून, तिन्ही एकत्र आल्यास विकासात्मक मार्ग सापडतो. विद्यार्थ्यांनी स्वत:चे ध्येय ठरविले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना प्रमाणापेक्षा जास्त मदत न करता त्यांना स्वत:च्या संघर्षातून जीवनाचे ज्ञान आत्मसात करु द्यावे. शिक्षण घेताना स्वयंमअध्ययन अधिक महत्त्वाचे आहे.

  उज्वल भवितव्यासाठी आत्मविश्‍वास ठेवून स्वावलंबी होण्याचा सल्ला त्यांनी दिला. कोणतेही काम करताना त्यावर निष्ठा ठेवून काम केल्यास यश मिळते. निर्णयक्षमता अंगी असणे गरजेचे आहे. नाहीतर आलेली संधी निघून जाते. चांगल्या नियोजनात यश दडल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात बी. डी. घोडके यांनी इंग्रजी विभागाच्या उपक्रमाची माहिती दिली.

  आर. जी. कोल्हे म्हणाले, कला शाखेत मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. प्राप्त केलेल्या ज्ञानाने काहीतरी नवीन करुन दाखविण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने कुटुंबाचा संवाद हरपल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. अर्चना रोहोकले यांनी केले. उपस्थितांचे आभार गजानन घोरपडे यांनी मानले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad