Header Ads

 • Breaking News

  राजकीय स्वार्थामुळे पांगरमल येथे निष्पापांचे बळी - देसाई

  अहमदनगर । DNA Live - जिल्हा पोलिस अधीक्षकांचा हलगर्जीपणा व स्वार्थी राजकारणामुळे पांगरमल (ता.नगर) येथे बनावट दारूमुळे सात जणांचा बळी गेले, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली. शिवसेनेच्या उमेदवाराच्या घरी झालेल्या पार्टीमुळे हा प्रकार झाला आहे. त्यामुळे कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी शिवसेनेने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

  तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पांगरमल गावाला भेट दिली. त्यांनी दारुकांडात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ग्रामस्थांशीही चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, नगर जिल्ह्यात इतकी मोठी घटना होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे किंवा खासदार दिलीप गांधी येथे साधी भेट देत नाहीत, या वरून संवेदनाहिन राजकारण्यांचे दर्शन घडले.

  बनावट दारूमुळे गोरगरीबांचे जीव जाताहेत, पण कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे या सर्व राजकीय हत्याच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. निवडणुका तरुणांना दारू पिण्याचे प्रशिक्षण देणारे केंद्रे बनल्या आहेत, असे स्पष्ट करून देसाई यांनी निवडणुकांच्या वेळी पूर्ण दारुबंदी करावी, अशी मागणी केली.

  जिल्हा रुग्णालयातील दारूच्या कारखान्याबाबत त्या म्हणाल्या, यात पोलिसांना हप्ते मिळत होते. त्यामुळेच त्यांच्या आशीर्वादामुळे हा धंदा राजरोसपणे सुरू होता. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे धंदे चालणे शक्यच नाही. पोलिसांना सर्व माहिती असते. मोठी घटना घडली, तर छोटी-मोठी कारवाई करून प्रकरण दडपले जाते. भरपूर पगार असतानाही पोलिस हप्ते घेऊन अवैध धंदे सुरू ठेवतात, असा आरोप त्यांनी केला.

  बनावट दारूने सात जणांचा बळी जाण्याच्या अशा घटना घडत असताना गृहमंत्रीपद असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात येऊन साधी पांगरमल गावाला भेट दिली नाही. हाच त्यांचा पारदर्षी कारभार आहे का? राज्यातील सर्व अवैध धंदे गृहमंत्र्यांनी बंद करावेत. ते जमत नसेल, तर त्यांनी गृहमंत्रीपद सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली.

  यावेळी ग्रामस्थांनी दारूला गावातून कायमचे हद्दपार करण्याचा संकल्प केला. या वेळी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे, सरपंच बापूसाहेब आव्हाड, उपसरपंच देवीदास आव्हाड, मानवाधिकार संघटनेचे डॉ. विजय मकासरे यांच्यासउपस्थित होते. यावेळी पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडीच्या श्रीक्षेत्र महादेव गड येथील महंत आदिनाथ आंधळे महाराज यांनी यावेळी दारुकांडात बळी पडलेल्या राजेंद्र आंधळे यांचा मुलगा अजय याचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले. संभाजी पालवे यांनी अजयची बहीण भक्ती हिच्या नावे दहा हजारांची मुदत ठेव ठेवली.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad