Header Ads

 • Breaking News

  रागावून घराबाहेर पडलेली युवती सुखरूप पालकांच्या ताब्यात

  कुंटणखान्यात विकल्याचा केला होता बनाव

  अहमदनगर । DNA Live24 - आई रागावल्यामुळे चिडून घरातून निघून आलेल्या युवतीने स्वत:ला कुंटनखाण्यात विकल्याचा बनाव केला. अन् प्रशासन चांगलेच कामाला लागले. मात्र, स्नेहाधार प्रकल्पात या युवतीला दाखल केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले. स्नेहाधारच्या प्रकल्प व्यवस्थापिका शिल्पा केदारी व टीमच्या प्रयत्नांमुळे युवतीच्या  पालकांसोबत संपर्क साधण्यात आला. अन् तिला पुन्हा सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले. राहुरीच्या उषा तनपुरे यांच्या प्रयत्नांमुळे ही युवती स्नेहाधारमध्ये दाखल झाली होती.

  घरात लाडात वाढलेली शिखा (नाव बदललेलं) व्यावसायिक प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे कळल्याने आई तिला रागावली. रागीट स्वभावाच्या शिखाने आई ओरडल्यामुळे घर सोडले. कोल्हापूरला जाताना तिला नीता आणि गीता नावाच्या दोन सख्या बहिणी भेटल्या. त्यांना घाबरलेल्या अवस्थेत पाहून तिने चौकशी केली. त्यांनीही सावत्र आईला कंटाळून घर सोडल्याचे सांगितले. त्यांच्याजवळ पैसे नसल्याने शिखाने त्यांना मदत करायचे ठरवले. अन् तेथून त्या शिर्डीत दाखल झाल्या.

  शिर्डीच्या प्रसादालयात जेवल्यानंतर कुठे काम मिळेल का, याची चौकशी त्यांनी केली. एका बाईने त्यांना राहुरीत लिज्जत पापड कारखाना असून तिथे तुम्हाला काम मिळेल, असे सांगितले. त्यामुळे तिघी राहुरीत दाखल झाल्या. राहुरी कारखान्यावर आल्या असताना डॉ. उषा तनपुरे यांच्या वाहनचालकाला या तिघी घाबरलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी डॉ. उषा तनपुरे यांचाशी संपर्क केला असता त्यांनी तिघींनाही घरी बोलावून घेतले.

  तनपुरे यांनी चौकशी केली असता मुलींनी त्यांना बनावट कथा सांगितली. दुसऱ्या दिवशीही त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तेच सांगितले. शिखाने तर आपल्याला मामापासून धोका आहे. मी कोणत्याही नातेवाईकांकडे जाऊ इच्छित नाही, असा जबाब दिला. पुढील पुनर्वसनासाठी पोलिसांनी तिला स्नेहाधारची माहिती दिली. त्यावर तिने स्नेहाधार संस्थेत राहण्याची इच्छा व्यक्त केली. राहुरीचे पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपेल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली शिखाला स्नेहाधार प्रकल्पात दाखल केले.

  स्नेहाधारच्या टीमने तिच्याशी संवाद साधला असता तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. ती माहिती सांगताना खूप विचारपूर्वक बोलत होती. त्यामुळे स्नेहाधारच्या टीमला थोडा संशय वाटल्याने त्यांनी शिखाची अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. शिखाचे व्यावसायिक प्रशिक्षणाचे ओळखपत्र त्यांच्या हाती लागले. त्यावर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता तिची आईशी, बोलून शिल्पा केदारी(प्रकल्प व्यावस्थापिका) यांनी सर्व माहिती घेतली.

  स्नेहालयाचे विश्वस्थ रावसाहेब दुशिंग यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा केली. शिखाचे आई, वडील जिवंत असून तिच्यावर कुठलाही अतिप्रसंग झाला नसल्याचे समोर आले. तिच्या आई-वडील व आजीला शिखा स्नेहाधार प्रकल्पात सुखरूप असल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले. पालकांना पाहून शिखानेही हंबरडा फोडला. मग शिखाला पुन्हा तिच्या इच्छेनुसार पालकांच्या ताब्यात  स्नेहाधारने सोपवले. तिला सुखरूप पोहचवण्यासाठी  प्रियंका सोनवणे, योगिता जगताप, यांनी परिश्रम घेतले.

  'स्नेहाधार'शी संपर्काचे आवाहन - संकटग्रस्त महिला व युवती समस्येमध्ये असतील तर स्नेहाधार प्रकल्पाशी केव्हावी संपर्क साधू शकतात. महिला व युवतींनी काहीही अडचण आल्यास स्नेहाधार प्रकल्पाच्या ०२४१२३४०४४४/५, ९०११३६३६००, ९०११०२०१७५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहाधारच्या प्रकल्प समन्वयक शिल्पा केदारी यांनी केले आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad