Header Ads

 • Breaking News

  कोपर्डी खटला - वकिलाच्या गैरहजेरीमुळे सुनावणी स्थगित

  अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी खटल्याची सुनावणी गुरूवारी स्थगित ठेवण्याची वेळ आली. आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे अनुपस्थित असल्यामुळे न्यायालयाने एक दिवसासाठी खटल्याचे कामकाज स्थगित केले. शुक्रवारी आरोपीने वकिलांची पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना न्यायालयाने दिल्या. त्यामुळे शुक्रवारी खटल्याचे कामकाज चालेल, अशी अपेक्षा आहे.

  बुधवारपासून जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पहात आहेत. या खटल्यात गुरूवारी काही डॉक्टरांच्या साक्षी नोंदवल्या जाणार होत्या. हे साक्षीदार न्यायालयात उपस्थित होते. मात्र, आरोपी भवाळ याचे वकील खोपडे अनुपस्थित होते. ऐनवेळी खोपडे यांच्या वतीने न्यायालयात गैरहजर राहण्याचा अर्ज आला.

  खटल्यासाठी पुण्याहून येताना अॅड खोपडे यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे ते सुनावणीसाठी आले नाही. अखेरीस एक दिवसासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. शुक्रवारी अॅड. खोपडे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याबद्दल सूचना करण्यात आली आहे. अन्यथा आरोपीने त्याच्यासाठी इतर वकिलाची पर्यायी व्यवस्था करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, खटल्यातील पुरावे मांडण्याच्या दृष्टीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात एक अर्ज दिला. हे पुरावे प्रोजेक्टरद्वारे न्यायालयात दर्शविण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. 

  Post Top Ad

  Post Bottom Ad