Header Ads

 • Breaking News

  खून करुन स्वत:च गेले पोलिस ठाण्यात

  अहमदनगर । DNA Live24 - मोटारसायकल विक्रीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून भिंगारमध्ये बुधवारी रात्री दोन गटात वाद झाले. तिघांनी मिळून एका युवकाचा खून झाला. शेखर देविदास गायकवाड (वय १९, रा. भिंगार) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शेखरचा खून केल्यानंतर त्याचे मारेकरी तक्रार देण्यासाठी स्वत:हून पोलिसांत गेले होते. पोलिसांनी त्यांची तक्रारही नोंदवली. अन् लगेचच त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाने दोघांनाही ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  रोहित रमेश कांबळे व शुभम शाम कांबळे (दोघेही रा. भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास सदर बाजारातील पालखीच्या ओट्याजवळ त्यांचे शेखरसोबत वाद झाले. मोटारसायकल खरेदीच्या कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यावसान नंतर मारामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. त्यावेळी माला रमेश कांबळे हिने शेखरला धरुन ठेवले. तर रोहितने त्याला चाकूने भोसकले. शुभमने त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला.

  या मारहाणीत शेखर जागीच गतप्राण झाला. या घटनेनंतर रोहित व शुभम स्वत:हून पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेले. तोपर्यंत पोलिसही घटनास्थळी आले होते. सहायक पोलिस अधीक्षक तथा शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक चिन्मय पंडित, भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हेही तेथे आले. याप्रकरणी शेखरचा भाऊ सागर देविदास गायकवाड याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित, शुभम यांच्यासह माला कांबळे हिलाही आरोपी केले आहे.

  गुरूवारी दुपारी रोहित व शुभम कांबळे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडे गाडीविषयी, तसेच पैसे काेठून आणले, शेखरला किती पैसे दिले होते, याची चौकशी करायची आहे. रक्ताचे नमुने ताब्यात घ्यायचे आहेत. आणखी आरोपींबाबत विचारपूस करायची आहे. खुनाचे नेमके कारण शोधायचे आहे, त्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केली. न्यायालयाने दोघांनाही ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

  Post Top Ad

  Post Bottom Ad