Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, २९ मार्च, २०१७

भुताच्या शोधात घालवली स्मशानात रात्र !

शेवगाव  । DNA Live24  - भूत, पिशाच्च व स्मशान याबाबतच्या अंधश्रद्धा, रूढी व परंपरा नष्ट व्हाव्यात या हेतूने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने शहरातील सोनामियॉं स्मशान भुमीत काल (दि. 27) अमावस्येच्या रात्री भूतांच्या शोधात स्मशान सहल व कविसंमेलन हा उपक्रम राबविण्यात आला. विविध विषयांवर प्रबोधन व कविसंमेलन रात्री उशीरा बारा वाजेपर्यंत चांगलेच रंगले. प्रा. दिलीप फलके यांचा वाढदिवसही स्मशानभुमीत साजरा करण्यात आला.

माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, अंनिसचे जिल्हा मार्गदर्शक डॉ. संजय लड्डा, प्रा. किसन माने, कारभारी गायकवाड, चंद्रकांत कर्डक, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गणेश चेके, सुरेश पाटेकर, बबनराव धावणे, नगरसेवक नंदकिशोर सारडा, डॉ. मनिषा लड्डा आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे तालुकाध्यक्ष अविनाश देशमुख होते. अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे व डॉ. मच्छिंद्र वाघ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

अंनिस चळवळीचा इतिहास, सध्याच्या काळातील समाजातील अंधश्रद्धांचे स्वरूप, भूत, पिशाच्च व स्मशानाबाबतच्या समाजात रूजलेल्या अंधश्रद्धा, तसेच विविध अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचे प्रबोधनाचे मार्ग या बाबत प्रा. किसन माने यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य शिवाजीराव देवढे म्हणाले, लोकांना समजेल अशा सहज व सोप्या भाषेत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. प्रबोधन व पुरोगामी चळवळीत महिलांचा, तरूणांचा सहभाग वाढला तर चळवळ यशस्वी होण्यास मदत होईल.

डॉ. गणेश चेके यांनी अवयवदानाचे महत्व सांगून जिवंत पणी व मृत्यूनंतर कोणते अवयव दान केले जाते, याची माहिती दिली. डॉ. लड्डा यांनी मानसिक स्वास्थ्य व आरोग्य विषयावर प्रबोधन केले. ते म्हणाले, ताणतणावांच्या व्यवस्थापनातील अपयश, नैराश्य, दुभंगलेले व्यक्तीमत्व या मुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते. मानसिक आजाराचे प्रकार व उपचार याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कविसंमेलनात किरण पाटेकर या महाविद्यालयीन तरूणीने अंधश्रद्धा निर्मुलन ही कविता सादर करून शिक्षण घेतलेल्या तरूणही कसे अंधश्रद्धेला बळी पडतात या वर भाष्य केले. ती कवितेत म्हणते - शिकले सवरलेले आजचे तरूण, तरिही मांजर आडवे गेले की जातात घाबरून, अडाणी लोकांना सोडा हो, आज शिकलेले तरूण सुद्धा लग्न करतात पत्रिका पाहून.. मग काय उपयोग त्यांचा हे शिक्षण घेऊन. डॉ. गणेश चेके यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं भूत ही कविता सादर करत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कसे भांडवल केले जाते, यावर भाष्य केले.

चंद्रकांत कर्डक यांनी माणसे आसूर झाले तेव्हाच जगणे बेसूर झाले.. अशी पुरोगामी चळवळीवर कविता सादर केली. तहसिलदार गणेश मरकड यांची धुळफेरणी ही शेतकऱ्यांचे कष्टमय जीवनावरील कविता त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रा. लांडे यांनी सादर केली. राजू घुगरे यांनी हे उद्योग तुमचे भरलेल्या पोटांचे, थप्पीत सडलेल्या लालभडक नोटांचे... काय काम तेथे आमच्या छाटलेल्या बोटांचे... ही कविता सादर केली. संजय नांगरे यांनी खबरदार पुन्हा प्रेम कविता लिहाल तर... ही कविता सादर केली.

अजय सरोदे, संदीप गवळी, सुनील भानगुडे, अस्लम शेख, दादा नवघरे या मुलांनी अंधश्रद्देवर शॅार्टफिल्म तयार केली म्हणून यांचा काल स्मशानात सत्कार करण्यात आला. ओंकार भुजभळ व सहकाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन या विषयावर नाटिका सादर केली. या वेळी मोतीलाल बन्सवाल, तुषार मंचरे, आदित्य ढाकणे, भागवत वेताळ, वैभव फलके आदींसह मोठ्या संख्येने तरूण व नागरिक उपस्थित होते. समारोप प्रसंगी स्मशानात तेलकट खाऊ नये, ही एक अंधश्रद्धा असल्याने उपस्थितांना बटाटे वडा - पाव यांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन संजय नांगरे यांनी केले. तर राहुल सागडे यांनी आभार मानले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages