728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आभासी जगातील सत्य लक्षात घेऊन वास्तवात जगावे - कळमकर

अहमदनगर । DNA Live24 - महाविद्यालयातील वय हे प्रचंड उर्जा असलेले वय असते. आज इंटरनेटमुळे विद्यार्थी आभासी जगात वावरत आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीतील सत्यता लक्षात घेउन वास्तवात जगावे, असे प्रतिपादन लेखक व शिक्षक नेते संजय कळमकर यांनी केले. ते अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथील जनता कला विज्ञान महाविद्यालच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खजिनदार रा. ह. दरे, पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर, सरपंच दिपाली गोरे, देवराम जगदाळे, बाळकृष्ण दरंदले, एकनाथ गोरे, प्राचार्य डॉ. सुरेश बाबर उपस्थित होते. यावेळी कळमकर म्हणाले, माणसांमध्ये ६४ कला आहेत. पण ६५ कला असणारीही अजब माणसे आपल्याकडे आहेत. दुसऱ्याला प्रेरणा देणे ही एक कला आहे. महाविद्यालयातील वय महत्वपुर्ण असून येथेच आपण घडतो.

महाविद्यालयात शिक्षण घेताना वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळते. मात्र इंटरनेटमुळे आभासी जग निर्माण झाले आहे. या आभासी जगामध्ये विद्यार्थी जगताना दिसत आहे. विज्ञानाच्या अतिक्रमणामुळे मेंदूच्या संवेदनशून्य झाला आहे. आपणाला स्वतची काळजी असण्यापेक्षा जगाची काळजी असते. इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी इंटरनेटमुळे आलेला आभासीपणा सोडून वास्तवात जगावे.

आभासीपणामुळे अस्वस्थतेची कीड तारुण्याला लागली आहे. त्यामुळे पुस्तकाशी मैत्री करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आई - वडिलांचे कष्ट सातत्याने स्मरणात ठेवले पाहिजेत. आदर्श ठेवताना आदर्शाचे कार्य लक्षात घ्या. संकट आल्याशिवाय, अडीअडचणी आल्याशिवाय जीवन जगण्यात मजा नाही, असेही कळमकर यांनी सांगितले. याप्रसंगी वर्षभरात विविध क्षेत्रातील कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

यावेळी रा. ह. दरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत चढाअोढीने भाग घेतला पाहिजे. आजचा तरुण बेशिस्त वागताना दिसतो. विद्यार्थ्यांनी शिस्तीत वागत स्वत:ची वेगळी ओळख तयार करावी, असेही दरे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरेश बाबर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अनिता भद्रे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डी. बी. वाळके यांनी केले. तर आभार प्रा. एन. एस. निपुंगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रेश्मा सोनवणे, डी. एस तळुले, आर. एल. गोरे यांनी परिश्रम घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आभासी जगातील सत्य लक्षात घेऊन वास्तवात जगावे - कळमकर Rating: 5 Reviewed By: DNA Live24