728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

घोडेगावच्या भारत फुलमाळीची मराठी सिनेसृष्टीत भरारी

घोडेगाव । DNA Live24 - सिनेक्षेत्रात काम करण्याचे स्वप्न बहुतांश जण पाहतात. पण, ते स्वप्न साकार होतेच असे नाही. अनेकदा अशी स्वप्न पाहणारी लाेकं मायानगरी मुंबईत जाऊन नशिब आजमावण्याचा प्रयत्न करतात. पण तेथेही त्यांना यश येतेच असे नाही. कारण सिनेसृष्टीमध्ये जितके ग्लॅमर आहे, तितकाच या मायावी नगरीत प्रवेश करण्याचा, यशस्वी होण्याचा खडतर प्रवासही आहे. घोडेगावच्या (ता. नेवासे) भारत यलाप्पा फुलमाळी याला मात्र अपघाताने सिनेमात काम करण्याची संधी मिळाली, अन आता त्याचा प्रवास सुरू झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे एका भोजपुरी सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. लहानपणापासून सिनेमाची आवड असलेला भारत तेथे शुटिंग पहायला गेला. बघ्यांच्या गर्दीत उभ्या असलेल्या भारतकडे दिग्दर्शक सुरेश शंकर झाडे (भावसार) यांचे लक्ष गेले. त्यांनी भारतला जवळ बोलावून सिनेमात काम करणार का? अशी विचारणा केली. आधीपासूनच सिनेमाची आवड असली तरी अभिनयातले काहीच येत नसल्याचे भारतने सांगितले. तरीही त्यांनी भारतला संधी देवू केली.

दिग्दर्शक सुरेश झाडे यांच्या "माणूस : एक माती' या सिनेमात त्यांनी भारतला सहायक खलनायकाची भूमिका दिली. या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले. मराठीतील आघाडीचा अभिनेता िसद्धार्थ जाधव, गणेश यादव, रुचिता जाधव यांच्यासोबत काम करण्याची संधी भारतला मिळाली. नेवासे तालुक्यातील देडगाव, कुकाणा, वडाळा बहिरोबा, डोंगरगण, मांजरसुंबा, नेवासे फाटा व मुंबई येथे सिनेमाचे चित्रीकरण पार पडले. येत्या २४ मार्चला हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

याशिवाय आगामी "मराठा चोवीस कॅरेट' या सिनेमातही काम करण्याची संधी भारतला मिळाली आहे. इयत्ता चौथीपर्यंतच शिक्षण असूनही भारतला सिनेमाची प्रचंड आवड होती. त्याने यापूर्वी "रेबिज', "माझी काय चूक', "त्रिकोणाची चौथी बाजू', या लघुपटांमध्ये काम केलेले आहे. आता आगामी "आई आणि बाबा' या लघुपटातही त्याला संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील युवकाची सिनेक्षेत्रात भरारी घेतल्यामुळे गावातून व परिसरातून भारत फुलमाळी यांचे कौतुक होत आहे. त्याच्या कामाला पावतीही त्यांना मिळत असून सर्वांना आता 'माणूस : एक माती' सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागलेली आहे.
संधीचे सोने करीन - लहानपणापासून सिनेमाची प्रचंड आवड होती. पण, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्याला काम करण्याची संधी मिळेल. आता दिग्दर्शिक झाडे यांच्यामुळे मिळालेल्या या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. या क्षेत्रातही यशस्वी होण्याचा मानस आहे. दिग्दर्शक झाडे यांच्या आगामी सात सिनेमांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामध्येही भूमिका साकारण्याची संधी देण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे या क्षेत्रात नशिब आजमावणार आहे. - भारत फुलमाळी, अभिनेता
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: घोडेगावच्या भारत फुलमाळीची मराठी सिनेसृष्टीत भरारी Rating: 5 Reviewed By: DNA Live24