Header Ads

  • Breaking News

    नेवाशातही नगरमधूनच बनावट दारुचा पुरवठा

    अहमदनगर । DNA Live24 - तरवडी (ता. नेवासे) येथील बिबन इब्राहिम सय्यद (वय ३२) या तरूणाचा मृत्यू नगरच्या बनावट दारुमुळेच झाला आहे. नेवासे पोलिसांच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. पांगरमल दारुकांडात अडकलेल्या आरोपींनीच नेवाशातही बनावट दारुचा पुरवठा केला होता. त्यामुळे बिबनच्या मृत्यूप्रकरणी आता नेवाशातही स्वतंत्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

    बुधवारी सकाळी नेवासे तालुक्यातील तरवडी येथे बिबन सय्यदचा मृत्यू झाला. त्याचा व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवला होता. त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून बिबनचा मृत्यूही बनावट दारुमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नेवासे पोलिसांनी याप्रकरणी बुधवारीच दोघांना ताब्यात घेतले होते. भेंडे शिवारातील एका हॉटेलातून त्यांनी दारु घेतली होती. पोलिसांनी संबंधित हॉटेलला सील ठोकले. आता पोलिसांच्या चौकशीत तेथेही नगरच्या सोनू दुगलनेच बनावट दारु पुरवल्याची माहिती समोर आली आहे.

    पांगरमल (ता. नगर) येथे दारु पिल्यामुळे नागरिकांचे बळी गेल्यानंतर बनावट दारु निर्मितीचे रॅकेट उजेडात आले. त्याची व्याप्ती राज्यभर पसरली आहे. पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत १६ आरोपी झाले आहेत. त्यापैकी १३ जणांना अटक झाली असून अद्याप ३ फरार आहेत. सध्या १ आरोपी पोलिस कोठडीत, तर उर्वरित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

    १४ फेब्रुवारीला बबन आव्हाड (रा. पांगरमल) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शिवसेनेचा गोविंद मोकाटे, भाग्यश्री मोकाटे, मंगल महादेव आव्हाड, महादेव आव्हाड, शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड व रावसाहेब आव्हाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध व इतर कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. सुरुवातीला भीमराज आव्हाडला अटक झाली. नंतर जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये सुरू असलेल्या बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी जगजीतसिंग गंभीर, जाकीर शेख व हमीद शेख यांना अटक झाली.

    नंतर नांदेडमधून मोहन श्रीराम दुगल, संदीप मोहन दुगल आणि वैभव जयसिंग जाधव यांना अटक झाली. सिव्हिल हडकोत राहणाऱ्या भरत रमेश जोशी यालाही अटक केली. रावसाहेब आव्हाडलाही अटक झाली. नंतर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मंगल आव्हाड, तिचा पती महादेव आव्हाड यांनाही अटक झाली. आरोपींना अल्कोहोलचा पुरवठा करणाऱ्या दादा वाणीलाही पोलिसांनी अटक केली. नंतर अजित सेवानी पोलिसांना गवसला.

    बनावट दारुनिर्मिती करण्यासाठी आरोपींना देशी दारुचा पुरवठा करणारा याकूब शेख, पांगरमल गावात मतदारांसाठी दारुच्या पार्टीचे आयोजन करणारे शिवसेनेचे गोविंद मोकाटे व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे हेही फरारच आहेत. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. आता नेवाशातही बनावट दारुनिर्मिती करणाऱ्या आराेपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल होणार आहे. त्या गुन्ह्यातही या आरोपींना वर्ग केले जाईल.

    Post Top Ad

    Post Bottom Ad