Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, १५ मार्च, २०१७

गर्भलिंग निदानाच्या विरोधात दवाखान्यांची धडक तपासणी : जिल्हाधिकारी कवडे

अहमदनगर l DNA Live24 - जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात नुकतेच काही रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भलिंग निदान करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या विरोधात जिल्ह्यातील सर्व प्रकारचे दवाखाने व रुग्णालयांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. एस. एम. सोनवणे, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. नागरगोजे, महापालिकेचे डॉ. बोरगे,  अन्‍न व औषध विभागाचे सहायक आयुक्‍त पी.एन. कातकडे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्‍हयातील लिंग गुणवत्‍ता  वा‍ढविण्‍यासाठी  समाजाची मानसिकता बदलणे सर्वात महत्‍वाचे असून यामध्‍ये गरोदर माता व त्‍यांचे नातेवाईक यांचे समुपदेशन  होणे आवश्‍यक आहे. तसेच तज्ञ डॉक्‍टरांनी  कोणत्‍याही  आमिषाला व प्रलोभनाला बळी न पडता गर्भलिंग निदान व स्‍त्रीभृण हत्‍या टाळून लिंग गणोत्‍तर प्रमाण वाढविण्‍यासाठी समर्पित भावनेने काम करावे. तपासणीची धडक मो‍हीम 15 मार्च 2017 ते 15 एप्रिल 2017 या कालावधीत राबवली जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

महाराष्ट्र  राज्‍यामध्‍ये सन 2011 च्‍या जनगणनेच्‍या उपलब्‍ध आकडेवारीवरुन निदर्शनास आले की, महाराष्‍ट्राच्‍या बाल लिंग गुणोत्‍तर प्रमाण 894 आहे  व सन 2001 च्‍या जनगणनेच्‍या तुलनेत 13 अंशाने कमी झालेले आहे.  तेव्‍हापासून  पी सी पी एन डी टी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्‍यात येत आहे.  तरी सुध्‍दा म्‍हैसाळ  तालुका  मिरज येथे  1 मार्च 2017 रोजी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांच्‍या अनोंदणीकृत भारती हॉस्‍पीटलमध्‍ये गर्भपात  करतांना मृत्‍यू झाला आहे.  तसेच नाशिक जिल्‍हयामध्‍ये  गर्भलिंग  निदान करुन डॉ. बी एम शिंदे, ओझर ता. निफाड जि. नाशिक यांनी गर्भपात केल्‍याचे उघडकीस आले आहे.  त्‍याच प्रमाणे नागरी नोंदणीच्‍या महाराष्‍ट्र  राज्‍यातील शून्‍य  ते 6 वर्षे या वयोगटातील  महाराष्‍ट्रातील  नागरी नोंदणी  जन्‍माच्‍या वेळीचे लिंग गुणोत्‍तर प्रमाण सन 2015 मध्‍ये 907 व सन 2016 मध्‍ये 899 पर्यंत म्‍हणजे -8  अंकांनी कमी झाले आहे. ही बाब गंभीर व चिन्‍ताजनक आहे.  अहमदनगर जिल्‍हयातील लिंग गुणोत्‍तर 911 इतके असल्‍याची माहिती बैठकीत देण्‍यात आली.

अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये दिनांक 15 मार्च 2017 ते दिनांक 15 एप्रिल 2017  या कालावधीत  जिल्‍हयातील सर्व नोंदणीकृत  दवाखाने / सोनोग्राफी केंद्र /  वैद्यकीय गर्भपात केंद्र यांची तपासणी करण्‍यात येणार आहे. सद्यस्थितीत अहदमनगर जिल्‍हयात 1 जिल्‍हा रुग्‍णालय, 2 उपजिल्‍हा रुग्‍णालय व 23 ग्रामीण रुग्‍णालय , 96 प्राथमिक आरोग्‍य  केंद्र असून  महानगरपालिका हद्दीत 1 मॅटर्निटी होम (बीडीसीडी)  व 7 नागरी आरोग्‍य केंद्र आहेत.  तसेच शासकीय व निमशासकीय  नोंदणीकृत खाजगी दवाखाने ( नागरी ग्रामीण व मनपा)  मुंबई नर्सिंग होम अॅक्‍ट  अंतर्गत  971 रुग्‍णालये कार्यरत असून 396 सोनोग्राफी केंद्र व 232 वैद्यकीय गर्भपात केंद्र कार्यरत आहेत. या सर्व संस्‍था  व अनाधिकृत संस्‍था  याची तपासणी वरील कालावधीत धडक मोहीमे अंतर्गत करण्‍यात येणार असून दैनंदिन अहवाल राज्‍यस्‍तरावर सादर करण्‍यात येणार आहे.


दवाखाने / रुग्‍णालयांच्‍या तपासणीसाठी मार्गदर्शक सूचना
अहमदनगर जिल्‍हयात सर्व प्रकारचे दवाखाने / रुग्‍णालये यांच्‍या तपासणीची धडक मो‍हीम राबविण्‍यात येत असून ही मोहीम 15 मार्च 2017 ते 15 एप्रिल 2017 या कालावधीत राबवली जाणार आहे.
ही मोहीम नागरी व ग्रामीण या दोन्‍ही स्‍तरावर जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्‍य विभाग तसेच अन्‍न व औषध प्रशासन विभाग  यांच्‍या संयुक्‍त  समिती मार्फत  राबवली जाणार आहे.
तपासणीसाठी  विविध स्‍तरावर पुढील प्रमाणे समित्‍या गठीत करण्‍यात आलेल्‍या आहे.

जिल्‍हास्‍तरीय समिती
जिल्‍हाधिकारी –अध्‍यक्ष, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद – सह अध्‍यक्ष, आयुक्‍त  महानगर पालिका,  सदस्‍य, मुख्‍याधिकारी नगरपालिका- सदस्‍य, पोलीस अधीक्षक-सदस्‍य, अन्‍न व औषध प्रशासनाचे प्रतिनिधी – सदस्‍य, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी जिल्‍हा परिषद / जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक  -सदस्‍य सचिव हे असतील.

महानगर पालिका कार्यक्षेत्र
महानगर पालिकांचे आरोग्‍य अधिकारी / मनपा दवाखान्‍याचे अधीक्षक, मनपा क्षेत्रातील  संबंधित वॉर्ड अधिकारी यांचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्‍त यांचे प्रतिनिधी, आयुक्‍त  अन्‍न व औषध प्रशासन यांचे प्रतिनिधी.

महानगर पालिका वगळून इतर शहरी विभाग
नगरपालिका / परिषदेचे आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हाधिकारी  यांचे प्रतिनिधी, जिल्‍हा पो‍लीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, स्‍थानिक अन्‍न व औषध यांचे प्रतिनिधी ( नगर पालिकेत आरोग्‍य अधिकारी उपलब्‍ध नसल्‍यास त्‍या शहरातील जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक,  वैद्यकीय अधीक्षक  किंवा हे दोन्‍हीही अधिकारी उपलब्‍ध नसल्‍यास तालुका आरोग्‍य अधिकारी समितीमध्‍ये राहतील.)

ग्रामीण भाग
तालुका आरोग्‍य अधिकारी, उपजिल्‍हाधिकारी यांचे प्रतिनिधी , उप पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी,

नागरीकांसाठी आवाहन
पीसीपीएनडीटी  कायद्याअंतर्गत  कोणत्‍याही नोंदणीकृत  अनोंदणीकृत केंद्रातील  डॉक्‍टर किंवा अन्‍य कोणी प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष (उदा जाहीरात देणे, मध्‍यस्‍थी करणे इत्‍यादी)  कायद्याचे उल्‍लंघन केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास तशी माहिती देणा-या व्‍यक्‍तीस संबंधितांवर कोर्ट केस दाखल केल्‍यानंतर रुपये 25 हजार देण्‍यात येतात.
जिल्‍हयामध्‍ये  बेकायदा अनोंदणीकृत आलेल्‍या केंद्रांबाबत तक्रार नोंदविण्‍यासाठी  स्‍थापित केलेल्‍या www.amchimulgi.gov.in  वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवावी.
तसेच टोल फ्री हेल्‍पलाईन क्रमांक 1800 233 4475 वर तक्रार नोंदविण्‍यात यावी.
टोल फ्री  नंबरवर तक्रार करण्‍यात यावी.
अहमदनगर जिल्‍ह्यात  आता पर्यंत  40 सोनोग्राफी केंद्राविरुध्‍द कोर्टात केसेस दाखल करण्‍यात आलेल्‍या होत्‍या. त्‍या पैकी 8 केसेस प्रलंबित आहेत व कोर्टाने 32 केसेस निकाली काढलेल्‍या आहेत. त्‍यापैकी 10 सोनोग्राफी केंद्र धारकांना कोर्टाने शिक्षा  सुनविलेल्‍या आहेत.  उर्वरीत केसेस बाबत अपिल दाखल केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages