कुख्यात गुंड नितीन शिरसाठ दोन वर्षांसाठी तडीपार

अहमदनगर । DNA Live24 - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील कुख्यात गुंड व चंदनतस्कर नितीन विलास शिरसाठ याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. नगर उपविभागाचे प्रांताधिकारी वामन कदम यांनी फेब्रुवारी महिन्यातच त्याच्या तडीपारीचे आदेश काढले आहेत. गेल्या महिन्यात शिरसाठ याने भाजपचे नेवासे तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी घोडेगाव एमआयडीसी परिसरात गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

नितीन शिरसाठ याच्याविरुद्ध सोनई व राहुरी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राहुरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्याविरुद्ध चंदनतस्करीचा गुन्हा नोंदीस आहे. याशिवाय सोनई पोलिस ठाण्यात अलीकडेच त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने घोडेगाव एमआयडीसी परिसरात गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर त्याने काही साथीदारांसह भाजपचे नेवासे तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून आमदार मुरकुटे यांना शिवीगाळ दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या गुन्ह्यात त्याच्यासह संतोष भिंगारदिवे, योसेफ लोंढे, जॉन लोंढे, राजू ठुबेे, आदींना अटक झाली होती. नुकताच या गुन्ह्यात तो जामिनावर मुक्त झाला होता. 

शिरसाठ याच्याविऱुद्ध सोनई पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी या प्रस्तावाची शहानिशा केली. तेथून हा प्रस्ताव प्रांताधिकारी वामन कदम यांच्याकडे आला. त्यांनीही त्यावर सुनावणी घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तो तुरुंगात असल्याने त्याला हा आदेश बजावलेला नव्हता. शिरसाठ याला नगर व औरंगाबाद या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या तडीपारीच्या कालावधीत त्याला जेथे तो राहिल, त्या ठिकाणापासून नजिकच्या पोलिस ठाण्यात नियमित हजेरी लावावी लागणार आहे.
तोपर्यंत जिल्ह्याबाहेर - आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या नेवासे पोलिस करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होईपर्यंत संतोष भिंगारदिवे, राजू ठुबे, आकाश उर्फ पप्पू आल्हाट यांना जिल्ह्याबाहेर राहण्याची अट घालण्यात आलेली आहे.
इतर आरोपींची चौकशी - नेवासे तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून गुंडगिरीने चांगलाच उच्छाद मांडलेला आहे. नितीन शिरसाठ याच्याविरुद्ध काही महिन्यांपासून पोलिस तडीपारीचा प्रस्ताव तयार करत होते. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी औरंगाबाद व पुणे पोलिसांनीही यापूर्वी त्याला ताब्यात घेतलेले आहे. त्याचा साथीदार चाट्या उर्फ शाहरुख शेख याच्या प्रस्तावाचीही शेवगावच्या उपअधीक्षकांकडे सुनावनी प्रलंबित आहे. याशिवाय घोडेगाव परिसरातील आणखी काही गुंडांवरही अशीच कारवाई होणार आहे.