Header Ads

 • Breaking News

  कांडेकर खूून खटल्यात पाच आरोपींना जन्मठेप

  उपसरपंच प्रकाश कांडेकर यांच्या मारेकऱ्यांना गोव्यातून तत्कालीन एलसीबी टीमने ताब्यात घेतले हाेते. (संग्रहित छायाचित्र)
  अहमदनगर । DNA Live24 - नारायणगव्हाणचे (पारनेर) तत्कालीन उपसरपंच व सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश भाऊसाहेब कांडेकर यांच्या खून खटल्याचा निकाल अखेर जाहीर झाला. कांडेकर यांच्या खुनाचा कट रचणारा मास्टर माईंड राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल शेळके, शार्पशुटर अजित नायर, डॅनिअल रिचर्ड व सुपारी ठरवून देणारा राजेंद्र भोर या पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवले. या पाचही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच फतेहपूर (उत्तर प्रदेश) येथून हत्यार पुरविणार्‍या गोविंदसिंग यादव याला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. तर उर्वरीत आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

  तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक राजपूत
  राजकीय वर्चस्वातून झालेल्या या खुनाचे प्रकरण राज्यभर गाजले होते. कांडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला असता त्यांच्या मृतदेहातून गोळीच गायब करण्याचा प्रकारही घडला होता. त्याबद्दल सिव्हिल हॉस्पिटलच्या तत्कालीन डॉक्टरांनाही आरोपी करण्यात अाले होते. राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी आंदोलनेही झाली होती. गावात बंदही पाळण्यात अाला. त्यामुळे पोलिसांवर वेगाने तपास करण्याचा दबावही होेता.

  संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश व अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक राजपूत, फौजदार अलीखान पठाण, सहायक फौजदार शरद लिपाने, पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख, राजेंद्र वाघ, संजय इसार, पोलिस नाईक भरत डंगोरे, गणेश धुमाळ, भाऊसाहेब आघाव, सुनिल चव्हाण, जाकिर शेख, राजू सावंत व राकेश खेडकर, दीपक शिंदे, यांच्या टीमने केला होता. तर गुन्ह्याची कागदपत्रे तयार करण्याचे काम सहायक फौजदार अशोक फसले व पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल आहेर यांनी तयार केली होती,

  या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी काम पाहिले. तब्बल चार वर्षे या खटल्याची सुनावणी चालली. चार न्यायाधिशांपुढे या खटल्याची सुनावणी झाली. सध्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्यात एकूण ४१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

  हे होते आरोपीे - राजाराम जयवंत शेळके (नारायणगव्हाण, ता. पारनेर),  राहुल राजाराम शेळके (नारायणगव्हाण, ता. पारनेर), डॉ. सुभाष महादेव पाथरकर (जिल्हा रुग्णालय, नगर), डॉ. शशिकांत मुक्तेश्वर पखाले (जिल्हा रुग्णालय, नगर), अजित जगदीश नायर (लोहोगाव, पुणे), रिचर्ड थॉमसन डॅनिअल (लोहोगाव, पुणे), अजय जगदीश नायर (लोहोगाव, पुणे), राजेंद्र बाबाजी भोर (भोरवाडी, ता. पारनेर), जनार्दन उर्फ फंट्या विष्णू म्हस्के (शिरुर, पुणे), विनोद प्रकाश भालेराव (शिरुर, पुणे), गोविंदसिंग श्रीघत केसराम यादव (फतेहपूर, उत्तर प्रदेश). आतिश मोहन भालसिंग (त्रिवेणीनगर, निगडी, पुणे), अनिल परशराम छजलानी (भिंगार, नगर), अमोल नलावडे (लोहोगाव, पुणे).
  म्हणून केला खून -  राजाराम शेळके याच्या भावावर व मुलावर उपसरपंच प्रकाश कांडेकर यांनी प्राणघातक हल्ला केला होता. मात्र, त्याबद्दलच्या खटल्यातून कांडेकर व इतर संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर कांडेकर समर्थकांनी गावातून त्यांची मिरवणूक काढली. त्यामुळे शेळके पिता-पु़त्रांना कांडेकर यांच्याविषयी राग, द्वेष निर्माण झाला. नंतर राजेंद्र भोरच्या सहकार्याने त्यांनी खुनाचा कट रचून प्रकाश कांडेकर यांना संपवले होते.
  राजेंद्र भोरही दोषी - राजेंद्र भोर हा नारायणगव्हाण गावचा जावई होता. त्याची शेळके यांच्याशी ओळख झाली. त्याचे रुपांतर नंतर मैत्रीमध्ये झाले. भोर हा लष्करात (खडकी, पुणे) नोकरीला होता. खुनाचा कट रचण्यासाठी आईच्या आजारपणाचे कारण सांगून तो गावाकडे आला होता. नंतर पुन्हा ड्युटीवर रुजू झाला होता. पोलिसांनी त्याला तेथे जाऊन खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानेच शेळके व पुण्याच्या शार्प शुटर्सची ओळख करुन देत मध्यस्थाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी आरोपी केले होते.
  असा काढला काटा - आरोपी राजाराम शेळके, राहुल शेळके, राजेंद्र भोर यांनी संगनमत करुन कट रचला. त्यानुसार ३ लाखांची सुपारी देण्यात आली. शार्प शुटर अजित नायर, अजय नायर व रिचर्ड डॅनिअल यांना सुपारी देण्यात आली. अजित नायर व रिचर्ड डॅनिअल यांनी शिरुरपासून उपसरपंच कांडेकर यांचा पाठलाग केला. १३ नोव्हेंबर २०१० ला सायंकाळच्या सुमारास नगर-पुणे हायवेवर शिर्डीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांनी कांडेकर यांना अडवले. चालत्या दुचाकीवर जवळून कांडेकर यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना ठार मारले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad