Header Ads

 • Breaking News

  जितू गंभीरसह ५ आरोपी पुन्हा जाणार पोलिस कोठडीत

  अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बनावट दारुकांड प्रकरणातील ५ आरोपींना पुन्हा पोलिस कोठडीत घेतले जाणार आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अधिक तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी आवश्यक आहे, असा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात केला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी तो मंजूर केला आहे. त्यामुळे या पाचही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा पोलिस कोठडी मिळेल.

  भीमराज गेणू आव्हाड (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), रावसाहेब गेणू आव्हाड (दोघेही रा. पांगरमल, ता. नगर), जगजितसिंग किशनसिंग गंभीर, जाकीर कादीर शेख व हमीद अली शेख (तिघेही रा. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. अनुक्रमे २० व २२ फेब्रुवारीला या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले होते. पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

  त्यामुळे पोलिसांनी याबाबत जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पांगरमल गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेता या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा आहे. त्यासाठी या आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती अर्जात होती. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अर्जुन पवार यांनी बाजू मांडली. त्यांचा युक्तीवाद मान्य करीत सत्र न्यायालयाने अर्ज मंजूर केला. त्यामुळे सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. नंतर त्यांना पोलिस कोठडी सुनावली जाईल. तोपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत राहतील.

  दरम्यान आरोपी भरत जोशी च्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत झाली आहे. तर आरोपी अजित सेवानी व याकूब शेख यांना ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याकूब शेखला राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले होते.

  Post Top Ad

  Post Bottom Ad