Header Ads

 • Breaking News

  लातूर, बीड, परभणीला गारपीटचा जोरदार तडाखा !

  औरंगाबाद l DNA Live24 -यावर्षी दुष्काळातून थोडेफार सावरलेल्या मराठवाड्याला गारपीटीने जोराचा तडाखा दिला आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पंढरपुरातही गारपीट झाली. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय नांदेड, परभणीतही पावसाचं वातावरण आहे.

  मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्याने यावर्षी झालेल्या चांगल्या पावसाने सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र आज दुपारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे हाताशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे.

  जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गारपीटग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यावर कशी लवकरात लवकर मदत देता येईल त्यासाठी प्रयत्न करु, अधिवेशन झाल्यावर या भागात भेट देणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

  लातूरनंतर अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याकडे कूच केली आहे. परळी तालुक्यातील कौठाळी शिवारात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जनावरं दगावल्याची घटना घडली आहे.

  गटशेतीसाठी पुढाकार घेणारे परळी तालुक्यातील इंजेगावचे प्रयोगशील शेतकरी नाथराव कराड यांच्या शेडनेटं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेडनेटमधील मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे.

  शिवाय लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनाही गारपीटीचा फटका बसला. जिल्ह्यातील अर्जुनेश्वर देवस्थान येथील जुनं चिंचेचं झाड कोसळल्याने गाड्यांचं नुकसान झालं.

  लातूरमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. शिवाय उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे.

  अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. कारण हाताशी आलेलं पीक वाया जाण्याची चिन्हं आहेत. अनेक ठिकाणी गहू पिकाची काढणी झाली असल्याने त्याचं पावसाने मोठं नुकसान झालं आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad